वाचकांचे व्यासपीठ: जैतापूर हातिवले हमरस्त्यावरील साखर या गावच्या कातळावर चिरेखाणींच्या विळख्यात कातळ खोदचित्रांच्या दोन साईट आहेत.पैकी एलिफंट बर्डचे 12 फुट x 4 फुटाचे चित्र नष्ट होण्याच्या मार्गावर असलेले दिसते.लगतच्या चिरेखाणीचे मार्किंग या चित्रावर झाल्याचे स्पष्टपणे दिसते.कदाचित नजिकच्या काळात ते नष्ट झालेले असेल.
एकीकडे कोकणातल्या निवडक नऊ साईट्सचा समावेश जागतिक वारसा प्राथमिक यादीत झालेला असतानाच अनेक ठिकाणची चित्रे रस्ते,चिरेखाणी,आंबा कलमबागा यामुळे नष्ट झाली आहेत किंवा होण्याच्या मार्गावर आहेत ही अत्यंत क्लेशदायक बाब आहे.
रत्नागिरीतील “निसर्गयात्री” संस्थेसह रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील अनेक संस्था, समुह किंवा व्यक्तींनी आजवर 125 गावांमधून 151 साईट्सवरची 2000 हजारहून अधिक कातळ खोदचित्रे (Geoglyphs) शोधून काढली आहेत.मात्र त्यातील काही निवडक साईट्स सोडल्या तर बहुतांश ठिकाणी हा अनमोल ठेवा बेवारस अवस्थेत पडून आहे.
या सर्व साईट्स खासगी मालकीच्या असून बहुतांश मालकांना त्यांचे महत्व/गांभीर्य अद्याप कळलेले नाही.बहुतांश साईट्स अक्षरशः उघड्यावर असंरक्षित अवस्थेत आहेत. कित्येक चित्रांवरून माणसे,गाईगुरे यांची रहदारी सुरू आहे.कित्येक साईट्स वरून पावसाच्या पाण्याचे लोट वहाताना दिसतात.या गोष्टींमुळे ऑलरेडी अनेक चित्रांची भरपूर झीज झाली आहे.ती आता भरून न येणारी हानी आहे.मात्र सध्या अस्तित्वात असणारी सर्वच्या सर्व चित्रे आहेत त्या अवस्थेत संरक्षित होणे ही काळाची गरज आहे.
त्यासाठी त्या त्या साईट्सच्या मालकांना कनव्हिन्स करून माणसे आणि गाईगुरांची रहदारी तसेच पावसाळी पाण्याचे प्रवाह थांबवावे लागतील. त्या त्या गावातील स्थानिक मंडळे, संस्था किंवा ग्रामपंचायतींच्या माध्यमातून साईटभोवती दोन दोन चिऱ्यांची लाईन फिरविता येऊ शकेल.तसेच चिरेखाणी,कलम बागा,प्लॉटिंग,रस्ते विस्तार या बाबीही थांबवाव्या लागतील.
“निसर्गयात्री” संस्थेच्या अथक प्रयत्नातून रत्नागिरी येथे नुकतेच “कोकणातील कातळशिल्पे आणि वारसा केंद्र” सुरू झाले आहे. उपलब्ध होणाऱ्या निधीतील काही टक्के रकमेचा विनियोग या तातडीच्या आणि अत्यावश्यक कामांवर करता येणे शक्य झाल्यास धोक्यात असलेली अनेक कातळ खोदचित्रे नष्ट होण्यापासून वाचविता येतील अशी आशा करण्यास हरकत नाही.
AK मराठे,कुर्धे
पावस,रत्नागिरी
9405751698
Vision Abroad