मुंबई: मुंबईकर कोंकणवासियांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा बहुप्रतिक्षित आणि प्रतिष्ठित प्रकल्प ‘मुंबई ट्रान्स हार्बर लिंक’ 25 डिसेंबर रोजी जनतेसाठी खुला होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र एमएमआरडीएकडून अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
MTHL ब्रिज मुंबई ते नवी मुंबई जोडणारा महत्त्वाचा मार्ग असणार आहे. हा मार्ग सुरू होण्याची प्रतिक्षा गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईकरांना आहे. मात्र आता हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा बहुप्रतिक्षित मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक (MTHL) पूल लवकरच सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे. डिसेंबरमध्ये एमटीएचएल पुलाचे उद्घाटन होणार असून 25 डिसेंबरपासून तो वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचे वृत्त समोर येत आहे.
दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ या पुलाचे नाव ‘अटल बिहारी वाजपेयी स्मृती न्हावा शेवा अटल सेतू’ ठेवण्यात आले आहे. या पुलामुळे नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पाचे 96 टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत आहे.
‘ओपन रोड टोलिंग’ सिस्टिम
मुंबईतील हा MTHL ब्रिज देशातील सर्वात लांब सागरी सेतू आहे. तसेच हा देशातील पहिला पूल असेल ज्यावर ‘ओपन रोड टोलिंग’ (ओआरटी) प्रणाली सुविधा उपलब्ध असेल. या प्रणालीचा उद्देश टोल वसुली प्रक्रिया सुव्यवस्थित करणे आणि वाहतूक सुरळीत आणि सुलभ करणे हा आहे. खुल्या टोल पद्धतीमुळे वाहनांना टोल भरण्यासाठी पुलावर थांबावे लागणार नाही.
शिवडी-चिर्ले अंतर 15-20 मिनिटांत
18 हजार कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या 6 पदरी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक ब्रिजची एकूण लांबी 22.8 किलोमीटर आहे. यातील 16 किलोमीटर पूल हा समुद्रात आहे. पूल खुला झाल्यानंतर शिवडीपासून नवी मुंबईतील चिर्लेपर्यंत 15 ते 20 मिनिटांत पोहोचता येईल.
मुंबईचा प्रतिष्ठित प्रकल्प ‘MTHL’, मुंबईला नवी मुंबईशी जोडणारा, 25 डिसेंबर रोजी लोकांसाठी खुला होणार आहे,” असे ट्विट भाजप नेते वरुण सोनी यांनी केले आहे. तथापि, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार असलेल्या एजन्सीने अद्याप उद्घाटनाच्या तारखेची अधिकृत पुष्टी केलेली नाही.
वाशी पुलावरून प्रवाशांना नवी मुंबईत पोहोचण्यासाठी सध्या एक तासापेक्षा जास्त वेळ लागतो. अनेकवेळा ट्रॅफिक जॅम मुळे दोन ते अडीच तासही लागतात, हा मार्ग सुरु झाल्यास मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जेएनपीटी बंदराशी कनेक्टिव्हिटी वाढून प्रवास जलद होणार आहे.
Facebook Comments Box
Related posts:
Palghar Train Accident: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्या पर्यायी मार्गाने चालविण्यात येणार
कोकण रेल्वे
आमची पश्चिम रेल्वे मुंबई प्रवासी संघटनेच्या वतीने मुंबई लोकल संदर्भात पश्चिम रेल्वेच्या डिआरएम यांच्...
मुंबई
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची ‘शिवसृष्टी’ उभारण्यात यावी - दीपक केसरकर
सिंधुदुर्ग
Vision Abroad