मुणगे : आचऱ्याहून देवगडला (Devgad) जाणाऱ्या बसचे चाक मातीच्या ढिगाऱ्यावर चढल्याने चालकाचा ताबा सुटून बस रस्त्याजवळील घरात घुसली. या अपघातात (Bus Accident) चालक बापू लक्ष्मण काळे (वय ५४, रा. तळेरे) गंभीर जखमी झाले. त्यांना ओरोस येथे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
अपघात काल (शनिवार) दुपारी अडीचच्या सुमारास पोयरे-गोंदापूर (ता. देवगड) येथे झाला. यात वाहकासह दोन प्रवासीही जखमी झाले. याबाबत अधिक माहिती अशी : आचरा-खुडीमार्गे देवगड बस घेऊन दुपारी चालक बापू काळे निघाले होते. बस दुपारी अडीचच्या सुमारास पोयरे-गोंदापूर येथे आली असता चालक काळे यांचा अचानक बसवरील ताबा सुटला. त्यामुळे बस रस्त्याजवळ असलेल्या संजय सावंत यांच्या घराला धडकली.
मोठा आवाज झाल्याने ग्रामस्थ प्रकाश पालव, दीपक अपराज, नितीन जोईल, अमर अपराज, प्रथमेश पालव, किशोर पालव, पोयरे उपसरपंच समीर तावडे, मंगेश पालव यांसह ग्रामस्थांनी धाव घेतली. तत्काळ मदतकार्य सुरू करून बसमध्ये अडकलेल्या चालकाला लोखंडी पाराने दरवाजा तोडून बाहेर काढले. अपघातात चालक काळे यांच्यासह वाहक राजेंद्र मनोहर जाधव व प्रवासी रुही दीनानाथ पडवळ (वय २१) व मिताली प्रवीण मुणगेकर (१९, दोघे रा. कुडोपी) जखमी झाले.
Vision Abroad