Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इन्सुली-खामदेव नाका व झाराप झिरो पॉईंट येथे दोन ठिकाणी प्रस्तावित असलेल्या भुयारी मार्गांसाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात येणार आहे. या दोन्ही कामांसाठी ६४ कोटी रुपये मंजूर केले आहेत. राष्ट्रीय महामार्ग विभागाने यासाठी वर्षभरापूर्वीच प्राथमिक आराखडा तयार करून तो मंजुरीसाठी पाठविला होता.
इन्सुली येथे २ भुयारी मार्ग प्रस्तावित असून हे एक किलोमीटर लांबीचे आहेत. झाराप येथील भुयारी मार्ग हा दीड किलोमीटर लांबीचा आहे. बांदा बसस्थानक येथे ८० कोटी रुपये खर्चून ६०० मिटर लांबीचे उड्डाणपूल बांधण्यात येत असून त्याचे काम प्रगतीपथावर आहे. या दोन्ही कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याने या कामांना देखील लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. महामार्गवर सटमटवाडी येथे देखील २० कोटी रुपये खर्चून भुयारी मार्ग बनविण्यात येत आहे. वरील नव्याने मंजूर केलेल्या दोन्ही कामांची ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून ती पूर्ण देखील झाली आहे. आता लवकरच प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात येणार आहे.
इन्सुली खामदेव नाका हा सातत्याने वर्दळीचा आहे. याठिकाणी महामार्गवरून सावंतवाडी तसेच मडुरा, शेर्ले, आरोस, रेडी येथे जाण्यासाठी रस्ते एकत्र येतात. त्यामुळे याठिकाणी सातत्याने वाहनांची वर्दळ असते. याठिकाणी बरेच छोटे-मोठे अपघात देखील झाले आहेत. त्यामुळे याठिकाणी उड्डाणपूल व्हावे, अशी मागणी तत्कालीन रोणापाल सरपंच सुरेश गावडे, मडुरा सरपंच साक्षी तोरसकर, पाडलोस सरपंच अक्षरा पाडलोसकर, निगुडे उपसरपंच गुरूदास गवंडे, मोहन गवस, वाफोली येथील सामाजिक कार्यकर्ते संजय आईर यांनी लेखी निवेदनाद्वारे केली होती. सातत्याने पाठपुरावा करण्यात आल्याने राष्ट्रीय महामार्ग उपविभागाने याठिकाणी उड्डाणपूल होण्यासाठी सर्वेक्षण देखील केले होते. प्रारूप आराखडा तयार करून अंतिम मंजुरीसाठी दिल्ली येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या मुख्य कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता. सर्वेक्षण केल्यानंतर याठिकाणी उड्डाणपूल न उभारता भुयारी मार्गाना प्राधान्य देण्यात आले. त्यानुसार या कामांचा प्रारूप आराखडा तयार करून मंजुरीसाठी पाठविण्यात आला. राज्याच्या अर्थसंकल्पत या दोन्ही कामांना मंजुरी दिल्याने लवकरच याठिकाणीही कामांना प्रारंभ होणार आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad