नागपूर: रेल्वेत प्रवाशांकडून वातानुकूलित (एसी) कोचला जास्त मागणी असल्याने ‘स्लिपर कोच’ कमी करून ‘एसी कोच’ वाढवले गेले, असा दावा मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी केला.
मध्य रेल्वे नागपूर मंडळाच्या रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पत्रकारांनी मध्य रेल्वेसह देशभरात प्रवासी गाड्यांमधील सातत्याने स्लिपर कोच कमी होऊन वातानुकूलित ‘थ्री टायर एसी कोच’ वाढत असल्याकडे लक्ष वेधले होते. त्यावर राम करण यादव पुढे म्हणाले, रेल्वेत सातत्याने प्रवाशांकडून ‘स्लिपर’च्या तुलनेत ‘थ्री टायर एसी’ची मागणी जास्त वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे वातानुकूलित कोच वाढवले गेले.
देशातील काही ठिकाणी मागणीनुसार ‘स्लिपर कोच’च्याही गाड्या चालवल्या जात आहेत. त्यातच सध्या ‘एसी थ्री टायर’ आणि ‘स्लिपर कोच’मधील सीटच्या प्रवासी भाड्यात खूप जास्त फरक नाही. रेल्वेकडून सातत्याने पायाभूत सुविधा बळकट केली जात असून थ्री लाईन, फोर लाईनसह इतरही कामांना गती दिली गेली आहे. हे काम पूर्ण झाल्यावर मग कमी झालेल्या पॅसेंजर रेल्वे पुन्हा चालवण्याबाबत प्रक्रिया होण्याची आशा आहे. मध्य रेल्वेत अमृत भारत योजनेअंतर्गत १५ रेल्वे स्थानकांचा विकास होत असल्याचेही यादव म्हणाले.
महाव्यवस्थापकांचा दावा कितपत योग्य?
कोकण रेल्वे मार्गावरील कोकणकन्या आणि मांडवी या दोन गाड्यांचे दोन स्लीपर डबे कमी करून त्या जागी दोन ‘ईकाॅनाॅमी थ्री टायर एसी’ चे डबे जोडले गेले आहेत. या दोन्ही गाड्या मध्य रेल्वे कोकण रेल्वे मार्गावर चालवते. या गाड्यांना स्लीपर कोचपेक्षा एसी कोचला जास्त मागणी होती हे म्हणणे पूर्णपणे चुकीचे ठरेल. कारण या गाड्यांच्या स्लीपर कोच च्या तिकीट चार महिने आगावू बूक करताना भेटणे मुश्किल होत असे. मग मागणी कमी कशी असा प्रश्न प्रवाशांकडून विचाराला जात आहे. दुसरी गोष्ट म्हणजे स्लीपर श्रेणी आणि थ्री टायर एसी यांच्या तिकीट दरांमध्ये जास्त फरक नाही असे महाव्यवस्थापक बोलत आहेत. पण खरे पाहता थ्री टायर एसी चे प्रवासभाडे स्लीपर श्रेणीपेक्षा जवळपास तिप्पट आहे. त्यामुळे त्यांचा हा दावा पण चुकीचा आहे असे प्रवाशांकडून बोलले जात आहे.
Vision Abroad