सावंतवाडी : धनादेशाद्वारे मी शिवसेनेला (ठाकरे गट) एक कोटी रुपये दिले होते आणि ते दिल्याचा माझ्याकडे पुरावा असल्याचा खळबळजनक दावाही दीपक केसरकर यांनी केला. शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसांपूर्वीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले होते. त्यावेळी त्यांनी सावंतवाडीतील जनसंवाद यात्रेतून मंत्री केसरकर यांच्यावर टीका केली होती. त्याला मंत्री केसरकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले.
केसरकर म्हणाले, ‘माझ्या श्रद्धेवर ठाकरे यांनी संशय घेतला. मात्र, मी शिर्डीहून आणलेली साईबाबांची शाल ठाकरे यांना घातल्यानंतर ते मुख्यमंत्री झाले, याची कबुली रश्मी ठाकरे यांनी दिली होती. मग आता सावंतवाडीत येऊन खोटे कशाला बोलायचे? मला गद्दार म्हणण्याचा ठाकरे यांना अधिकार नाही. त्यांचे कर्तृत्व काय?
माझ्यात कर्तृत्व असूनही मला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी २०१४ मध्ये राज्यमंत्री केले; पण नंतरच्या काळात सत्ता आल्यानंतर माझ्याकडून कमिटमेंट पूर्ण न झाल्यानेच मला मंत्री करण्यात आले नाही. याची खुद्द आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनीच कबुली दिल्याचा दावा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केला. मुख्यमंत्री असताना लोकांना सोडा, आमदारांनाही ते भेटत नव्हते. मी तब्बल दोन महिने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाच्या बाहेर वाट बघत होतो; पण मला कधी भेटही मिळत नव्हती. मग त्यांच्याकडे लोक थांबणार कसे? मी स्वतःहून नाही, तर मला भाजपकडून निमंत्रण असतानाही ठाकरे यांनी सतत निमंत्रण दिले, म्हणून मी शिवसेनेत गेलो.’ असे ते पुढे म्हणालेत
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलेल्या उद्धव ठाकरे यांनी आपण पाणबुडी प्रकल्प मंजूर केल्याचा व तो गुजरातला नेण्यात आल्याचे सांगितले; पण वस्तुस्थिती सर्वांनी जाणून घ्यावी. पाणबुडी प्रकल्प मी स्वतः मंजूर केला होता; पण नंतरच्या पर्यटनमंत्र्यांनी तो प्रकल्प पुढे सरकवला नाही. त्यामुळेच तो रद्द झाला; मात्र आताच्या पर्यटनमंत्र्यांनी तो मंजूर केला असल्याचे मंत्री केसरकरांनी यावेळी सांगितले.
मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेची मते लाखांच्या आतमध्ये होती; पण मी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर हीच मते लाखांच्या बाहेर गेली. त्यामुळेच वैभव नाईक तसेच विनायक राऊत हे निवडून आल्याचा दावाही मंत्री केसरकर यांनी यावेळी केला.
Facebook Comments Box
Vision Abroad