सिंधुदुर्ग :काजू हंगामाला सुरुवात झाली आहे. या वर्षी काजू हंगाम १५ ते २० दिवस उशिराने सुरू झाला आहे. दोडामार्ग, बांदा, सावंतवाडी, वेंगुर्ला या तालुक्यांमध्ये काजू बी परिपक्व होण्यास सुरुवात झाली आहे. उर्वरित तालुक्यांमध्ये अल्प प्रमाणात काजू बी परिपक्व होऊ लागली आहे. मात्र काजू बीला प्रतिकिलो फक्त १२६ रुपये दर सध्या दिला जात असल्याने शेतकरी वर्ग नाराज आहे.
नोव्हेंबरमध्ये थंडीचा अभाव होता. त्यामुळे या वर्षी काजूला चांगला मोहर आला नाही. त्याचा परिणाम काजू उत्पादनावर होण्याची शक्यता आहे.दरवर्षीच्या तुलनेत उत्पादन घटण्याची शक्यता आहे. तरीदेखील काजू बीला १२६ रुपयेच दर मिळत आहे. काजू बीला प्रतिकिलो २०० रुपये दर मिळावा, अशी मागणी बागायतदारांकडून सध्या सुरू आहे.
हंगामाच्या सुरवातीलाच जर असा कमी दर भेटत असेल तर काही दिवसांत आवक वाढली काय अपेक्षा ठेवणार असा प्रश्न काजू उत्पादक शेतकरी विचारताना दिसत आहेत. कारण मागील दोन तीन वर्षे पाहता हा दर शंभर रुपयाच्या खाली गेला आहे. काजूला हमी भाव मिळावा या शेतकर्यांच्या मागणीला शासनाकडून नेहमीच केराची टोपली दाखवली जात आहे.
वन्यप्राणी, माकडे यामुळे ईतर शेती उत्पादन करणे खूप तोट्याचे झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग काजू बागायती कडे वळला आहे. वडिलोपार्जित तुकड्यांत जेथे जमेल तेथे विकत आणून काजू कलमांची लागवड करणे, त्याला खतपाणी आणि ईतर मशागत करून वाढवून शेवटी मिळणार्या उत्पन्नातून मजुरी आणि बाकीचे खर्च सुध्दा निघत नसतील तर आम्ही जगावे तरी कसे असा प्रश्न काजू उत्पादक शेतकर्यांकडून विचाराला जात आहे.
Vision Abroad