Coastal Highway Updates : रेवस रेड्डी सागरी मार्गावरील सहा मोठ्या पुलांची कामे लवकरच सुरू होणार आहेत, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या पूलांच्या निविदा प्रसिध्द केल्या आहेत. यामुळे चार दशकांपासून रखडलेल्या पुलांच्या कामांना गती मिळणार असून सागरी मार्गही दृष्टीक्षेपात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून उभारण्यात येत असलेल्या रेवस-रेडी या सागरी मार्गावरील सुमारे १६५ किलोमीटरच्या रस्त्याचे चौपदरीकरण केले जाणार आहे. उर्वरित रस्ता दुपदरी असेल, तर शहरांच्या ठिकाणी बाह्य वळणे घेण्यात येणार आहेत. सागरी मार्गाला सलगता येण्यासाठी या सहा ठिकाणी नव्याने पूल उभारले जाणार आहेत. खालील ठिकाणे असे पूल उभारण्यात येणार असून त्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या पूलांच्या निविदा मागवल्या आहेत.
• कुंडलिका खाडीवरील रेवदंडा-सालाव – 3.8 किमी
• बाणकोट खाडीवर कोलमांडिया-वेश्वी – 1.7 किमी
• दापोली-गुहागर दाभोळ खाडीवर – 2.9 किमी
• जयगड खाडीवर तवसाळ-जयगड – 4.4 किमी
• काळबादेवी खाडीवरील पूल, रत्नागिरी – 1.8 किमी
• कुणकेश्वर, सिंधुदुर्गवरील पूल – 1.6 किमी
कोकणातील समुद्र किनाऱ्यांवरील गावे आणि शहरांना जोडणारा एक महामार्ग असावा, ज्यामुळे कोकणातील पर्यटनाला चालना मिळेल, यातून रोजगार निर्मिती होईल आणि आर्थिक सुबत्ता वाढेल. मुंबईतून तळ कोकणात जाण्याचे अंतर कमी होईल. हा मार्ग मुंबई गोवा महामार्गाला पर्यायी मार्ग ठरू शकेल. यासाठी बॅरीस्टर ए. आर. अंतुले यांनी १९८० मध्ये रेवस रेड्डी सागरी मार्गाची संकल्पना मांडली होती. मात्र या मार्गावरील मोठ्या पूलांची कामे रखडल्याने हा सागरी मार्ग पुर्णत्वास जाऊ शकला नाही.
आता मात्र या सागरी मार्गावरील पूलांची कामे मार्गी लागणार आहेत. राज्य सरकारने यासंदर्भातली पाऊले टाकण्यास सुरूवात केली आहे.
Facebook Comments Box