सावंतवाडी, दि. १६ मार्च: सावंतवाडी शहराचे वैभव असणाऱ्या व जैवविविधतेने समृद्ध असलेल्या नरेंद्र डोंगरावर पर्यटकांना उद्यापासून नरेंद्र वन उद्यान निसर्ग पर्यटन सफारी वाहन, सावंतवाडी दर्शन मनोरा, निसर्गमाहिती केंद्र अशा सुविधा अनुभवता येणार आहेत. सावंतवाडी वन विभागांतर्गत येणाऱ्या नरेंद्र वन उद्यान येथे सिंधुरत्न योजनेतून पर्यटनवाढीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या विविध निसर्गपर्यटन सुविधांचा अनुभव घेण्यासाठी सर्व सावंतवाडीकरांना आवाहन करण्यात येत आहे.
पर्यटकांना मोती तलावा शेजारी असलेल्या जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यान ते नरेंद्र वन उद्यानापर्यंत जाण्यासाठी सफारी वाहनाने प्रवास करता येईल. नरेंद्र वन उद्यानामध्ये पोहोचल्यावर तिथे असलेला सावंतवाडी दर्शन मनोरा, निसर्ग माहिती केंद्र हे देखील पर्यटकांसाठी उपलब्ध असणार आहे.
सफारीचा मार्ग
येणार्या पर्यटकांना सावंतवाडी भोसले उद्यान ते नरेंद्र डोगर असे फिरविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे त्या ठिकाणी जाताना सावंतवाडीच्या मोती तलाव तसेच राजवाडा आदींची माहिती देवून शहराला वळसा घालून ही सफर थेट सालईवाडा गणपती मंदिर हॉलकडुन नरेंद्र डोंगरावर नेण्यात येणार आहे. त्या ठिकाणी जाताना सर्व झाडांची स्थानिक स्तरावर आढणारे प्राणी, पक्षी, बुरशी आदींची माहिती देण्यात येणार आहे. त्याच बरोबर त्या ठिकाणी जावून निसर्ग माहिती केंद्रांत सिंधुदुर्गात आणि सह्याद्री पट्ट्यात आढळून येणार्या प्राणी, पक्षी व फुले, फळे आदींची माहिती देण्यात येणार आहे.
वेळापत्रक
जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यान ते नरेंद्र डोंगर प्रवास करण्यासाठी उपलब्ध असलेले सफारी वाहन प्रत्येक 2 तासाच्या अंतराने सकाळी 8 वाजता, 10 वाजता, 12 वाजता, दुपारी 2 वाजता, सायंकाळी 4 वाजता व शेवटची फेरी सायंकाळी 6 वाजता या वेळापत्रकानुसार सोडले जाईल.
शुल्क
या नरेंद्र डोंगर सफारीसाठी भोसले उद्यान ते नरेंद्र डोंगर सफारी चार्जेस, गाईड चार्जेस व निसर्ग माहिती केंद्र प्रवेश फी हे सर्व मिळून एकत्रितरित्या प्रौढांसाठी 100 रु. प्रति व्यक्ती तर 14 वर्षांखालील लहान मुलांसाठी 50 रु. शुल्क करण्यात येणार आहे. तरी सावंतवाडीकरांनी या निसर्ग पर्यटनाचा नक्की अनुभव घ्यावा असे सावंतवाडी वन विभागाकडून आवाहन करण्यात येत आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad