देवगड: देवगड तालुक्यातील मुणगे आडबंदर येथील सडा भागात दोन मानवाकृती कातळचित्रे सापडली आहेत. येथील देवगड इतिहास संशोधन मंडळाच्या वतीने त्याची पाहणी करण्यात आली. सापडलेल्या कातळचित्राच्या परिसराची जागा स्वच्छ करून चित्र खुले करण्यात आले. या परिसरात आणखी काही कातळचित्रे मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली.
कोकण इतिहास परिषद व देवगड इतिहास संशोधन मंडळ सातत्याने गेली काही वर्षे कातळचित्र शोधमोहीम राबवत आहे. याच मोहिमेतंर्गत तालुक्यातील मुणगे आडबंदर येथील सडा भागात दोन मानवाकृती कातळचित्रे सापडली. याची माहिती मिळताच प्राच्यविद्या अभ्यासक रणजित हिर्लेकर व अजित टाककर यांनी या कातळी चित्रांचा शोध घेतला. त्यावेळी तेथे पुसटशा मानवाकृती रेषा दिसत होत्या.
या दोन उलट सुलट साडेपाच फूट उंचीच्या मानवाकृती आहेत. उत्तर-दक्षिण अशी इथे जर मध्य रेषा काढली तर यातील एक आकृती पूर्वेकडे पाय सोडून व दुसरी आकृती पश्चिमेकडे पाय सोडून आहे. दोन्ही आकृत्यांची डोकी जवळ जवळ काढलेली नसावीत असे दिसते. डोक्याच्या जागी फक्त एक एक खळगे कोरलेले दिसते. या कातळचित्राच्या रेषा अतिशय सफाईने काढलेल्या दिसतात. खांदे, हात, कंबर, पायाच्या पोटऱ्या दर्शविणाऱ्या बाह्यरेषा सराईतपणे कोरलेल्या दिसतात. अन्यत्र आढळणाऱ्या मानवाकृती इतक्या सफाईने कोरलेल्या दिसत नाहीत.
कातळचित्राचे “मामा भाचे” नामकरण
येथील काही ग्रामस्थ या कातळचित्रांना “मामा भाचे” असे संबोधतात. या मागे एक ऐकिव कथा पण आहे. एके काळी मामा आणि भाचा येथे शिकारीला आले होते. हे दोघे कातळावर शिकारीसाठी फिरत असताना त्यांना शिकार न मिळाल्यामुळे येथे थकून बसले होते. इतक्यात एक कुठला तरी जंगली प्राणी या दोघांच्या मधून पळून जाताना त्यांना दिसला. दोघांनी तात्काळ त्या प्राण्याच्या दिशेने आपल्या बंदुकीतून गोळ्या झाडल्या. पण तो प्राणी शिफाईने पळून गेला व बंदुकीच्या गोळ्या लागून दोन्ही मामा भाचे ठार झाले. या मानवाकृतीच्या डोक्याच्या जागी जे दोन खळगे दिसतात त्या त्यांना लागलेला गोळ्या आहेत असे येथील गाववाले समजतात. (या कथेस कोकणाई दुजोरा देत नाही. फक्त वाचकांच्या माहितीसाठी हे येथे लहिण्यात आले आहे.)

Facebook Comments Box