सावंतवाडी, दि. २३ मार्च : शहराच्या पर्यटन वाढीसाठी नरेंद्र डोंगरावर सुरू केलेली जंगल सफारी दिनांक ३१ मार्च पर्यंत मोफत करण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
या सफारीच्या उद्घाटन प्रसंगी पर्यटकांना ही सेवा दिनांक ३१ मार्चपर्यंत मोफत देण्यात येईल असे दीपक केसरकर यांनी जाहीर केले होते. मात्र त्या ठिकाणी शुल्क आकारण्यात येत होते. याबाबत परशुराम उपरकर समर्थक आशिष सुभेदार यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर ही सफारी आता मोफत सुरू करण्यात आली आहे. याबाबतची माहिती सुभेदार यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून दिली आली आहे.
आशिष सुभेदार यांच्या म्हणण्यानुसार, मंत्री केसरकर यांनी एका कार्यक्रमात ही सफर मोफत देणार असल्याचे जाहीर केले होते; परंतु त्या ठिकाणी वन विभागाकडून लहान मुलांसाठी ५० रुपये तर मोठ्यांसाठी १०० रुपये असा दर आकारण्यात आला होता. त्यानंतर ४ दिवस पैसे घेण्यात आले. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सुभेदार यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्याची दखल केसरकर यांच्याकडून घेण्यात आली असून, ही सफारी मोफत देण्यात यावी, अशा सूचना त्यांच्याकडून वन विभाग प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. त्यानुसार मोफत सफर सुरू केली असून, या सफारीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे
Vision Abroad