सिंधुदुर्ग: लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील जागा कोणाला मिळणार याबाबत येथील नागरिकांना उत्सुकता लागली असताना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांच्या बद्दल केलेल्या स्तुतिसुमनांनी चर्चेला उधाण आले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरुन महायुतीत तिढा निर्माण झाला आहे. या लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे किरण सामंत आणि भाजपचे नारायण राणे यांच्यामध्ये उमेवारीसाठी स्पर्धा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांच्या उमेदवारीला समर्थन देणारे वक्तव्य केले आहे. नारायण राणे ही केवळ एक व्यक्ती नव्हे तर त्यांच्यावर संपूर्ण जिल्ह्याचा विकास अवलंबून आहे, असे वक्तव्य दीपक केसरकर यांनी केले. ते सोमवारी सिंधुदुर्गात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
सिंधुदुर्गात नारायण राणे यांच्यासारखा आक्रमक नेता निवडून आला तर तुम्हाला आवडेल का, असा प्रश्न दीपक केसरकर यांना विचारण्यात आला. यावर दीपक केसरकर यांनी म्हटले की, नारायण राणे ही फक्त एक व्यक्ती नाही, त्यांच्यासोबत आमचं सिंधुदुर्गाचं मंत्रिपद आहे. आमचा पुढचा विकास त्यावर अवलंबून आहे. आज त्यांना राज्यसभेचे तिकीट मिळालेले नाही. ते लोकसभेवर निवडून आले तर ते मंत्री बनण्याची त्यांची क्षमता आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्याला मिळणारं केंद्रीय मंत्रिपद घालवायचे का, याचा विचार जनतेने केला पाहिजे. मी नाही, माझं कसं आहे, एखादा संघर्ष झाला तर तो विषयापुरता मर्यादित असतो. आम्ही कोकणी लोक आहोत, आमचा जिल्हा आमच्यासाठी प्राधान्याचा विषय आहे. कोकणातील माणूस कधीच कोणाकडे मागत नाही, कर्जमाफी मागत नाही, फक्त कधीतरी मदतीची गरज लागते. पण विकासाची गंगा कोकणात येण्याची आवश्यकता आहे, असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.
साहजिकच दीपक केसरकरांच्या या वक्तव्यांनी अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दीपक केसरकारांचे सध्याच्या मंत्री मंडळातील स्थान पाहता ही जागा भाजपाला देण्यात येणार असल्याचे सूचक विधान त्यांनी केले असल्याचे बोलले जात आहे .
Facebook Comments Box
Vision Abroad