सावंतवाडी, दि . २६: कुणकेरी गावचा प्रसिद्ध हुडोत्सव शनिवारी दिनांक ३० रोजी साजरा करण्यात येणार आहे. शुक्रवार दिनांक २९ पासूनच या उत्सवाला सुरुवात होणार आहे.
शुक्रवारी (ता. २९) दुपारी २ वाजता गाव रोंबाट सुटणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता हुड्याजवळ सामुदायिक नारळ फोडण्यात येणार आहेत. रात्री ९ वाजता घुमट वादनासह हुडा आणि होळीवर धूळ मारण्यात येणार आहे. रात्री १० वाजता गाव रोंबाट आणि रात्री ११ वाजता हुडा आणि होळीवर पेटत्या शेणी फेकून ढोलताश्यासह भाभीचे रोंबाट आणून नंतर कवळे व पेटत्या मशाली घेऊन हुडा आणि होळीभोवती फिरण्याचा कार्यक्रम होणार आहे.
शनिवारी (ता. ३०) हुडोत्सवाच्या मुख्य दिवशी सकाळपासून श्री भावई देवीच्या निवासस्थानी तसेच मंदिरात देवीची ओटी भरणे, नवस फेडणे आदी कार्यक्रम होणार आहेत. दुपारी २ वाजता मांडावरून गाव रोंबाट सुटणार आहे. याचवेळी पळसदळा येथे आंबेगावच्या श्री देव क्षेत्रपाल निशाणाची भेट होणार आहे. त्यानंतर कोलगाव सीमेवर कलेश्वर देवस्थानची निशाण भेट होऊन सर्वजण भावई मंदिराकडे येणार आहेत. शनिवारी (ता.३०) सायंकाळी ४ वाजता हुड्याजवळ घोडे मोडणी व लुटूपुटूचा खेळ होणार आहे. सायंकाळी ५ वाजता हुड्यावर चढलेल्या अवसारांवर दगड मारण्याच्या पारंपरिक कार्यक्रमाने हुडोत्सवाची सांगता होणार आहे. या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन स्थानिक देवस्थान कमिटी, गावपंच आणि कुणकेरी ग्रामस्थांनी केले आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad