सावंतवाडी :लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेती संरक्षण बंदूक जमा करण्यासाठी आदेश काढल्याने शेतकरी वर्गाने नाराजी व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांच्या बंदुका सरसकट जमा करण्याबाबतचे आदेश शिथिल करण्याची मागणी नेमळे येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांच्या मते, सध्या उष्णतेतही वाढ झाली आहे. जंगलात पाणीसाठा नसल्याने वन्य प्राणी लोकवस्तीमध्ये घुसत आहेत. त्यांच्याकडून नागरिकांवर हल्ले होत असल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे शेती संरक्षण बंदूक गरजेची आहे. मात्र, निवडणूक विभागाने शेतकऱ्यांच्या बंदुका जमा करून करून घेण्याचे आदेश पारित केले आहेत, हे शेतकऱ्यांचे दुर्दैव आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात माणूस जखमी किंवा मृत्यू झाला तर त्याबाबतची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न शेतकऱ्यांनी विचारला आहे.
वन्य प्राणी त्रास देत असतील तर हवेत गोळीबार करून शेतकरी आत्मसंरक्षण करतात आणि प्राण्यांना पळवून लावतात हे परंपरेप्रमाणे अनेक वर्ष होत आहे. ज्या शेतकऱ्यांच्या बंदुकांच्या बाबत पोलिस स्थानकामध्ये गुन्हे दाखल असतील किंवा तक्रारी असतील त्या बंदुका पोलिसांनी जप्त कराव्यात. मात्र, कायद्याचे पालन करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांच्या बंदुका सरसकट जमा करण्याबाबतचे आदेश शिथिल करण्याची मागणी करण्यात येत आहे. यासंदर्भात शेती संरक्षक परवानधारक शेतकरी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन लक्ष वेधणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
Facebook Comments Box
Vision Abroad