पुणे, दि. ११ एप्रिल: मुलांच्या परीक्षा संपल्या की वेध लागते ते गावी जायचे. शहरातील भयंकर उकाडा सहन करण्यापेक्षा सुट्टी घेऊन ती गावीच खर्च करावी अशी जवळपास सर्वच चाकरमान्यांची इच्छा. यासाठी त्याची तीन चार महिनेच प्लॅनिंग चालू होते. त्यात गावी जाण्यासाठी रेल्वे आरक्षण करणे हे प्राधान्याने येतेच. मात्र मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नियमित गाड्यांची तिकिटे मिळणे खूपच अवघड होते. अशा वेळी रेल्वेच चाकरमान्यांच्या मदतीला धावून येते. काही विशेष गाड्या सोडून किंवा आहे त्या गाड्यांच्या फेर्या वाढवून प्रवाशांची गर्दी कमी करण्याचा प्रयत्न केला जातो.
याचाच एक भाग म्हणुन प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने एका विशेष गाडीच्या फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर ते पुणे दरम्यान चालविण्यात येणार्या 01165/01166 गाडीच्या फेर्या वाढविण्यात येणार आहे. सध्या ही गाडी आठवड्यातुन दोन दिवस चालविण्यात येते. मात्र दिनांक 18 एप्रिल ते 14 जून या कालावधीत ही गाडी आठवड्यातून तीन दिवस चालविण्यात येणार आहे. त्यामुळे या गाडीच्या दोन्ही बाजूने एकूण 18 अतिरिक्त फेर्या होणार आहेत.
दिनांक 18 एप्रिलपासून नागपूर (01165) येथून दर गुरुवारी तर दिनांक 19 एप्रिल पासून दर शुक्रवारी पुणे(01166) येथून हा अतिरिक्त फेर्या सुरू होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
Vision Abroad