रत्नागिरी :मुंबई मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसच्या चेअर कार श्रेणीचे खेड ते मडगाव (341 किमी) चे एकूण प्रवासी भाडे ११८५ रुपये इतके आहे, तर मुंबई – गांधीनगर या वंदे भारत एक्सप्रेसच्या त्याच श्रेणीचे बोरिवली ते वडोदरा दरम्यानचे, जवळपास तेवढ्याच अंतराचे (३६२ किमी) भाडे ९९५ रुपये एवढे आहे. म्हणजे जवळपास २०० रुपयाचा फरक आहे. एकाच देशातील दोन समान गाड्यांच्या समान श्रेणीच्या प्रवासी भाड्यात एवढा फरक का हा प्रश्न पडणे साहजिकच आहे. वंदे भारत एक्सप्रेसच्या बाबतीतच नाही तर इतरही गाड्यांच्या प्रवासीभाड्यात हा फरक येतो. असे का? कोकण रेल्वेचा प्रवास महाग आहे का? हे प्रश्न सहाजिकच पडतात. चला मग याचे उत्तर शोधूया.
रोहा ते ठोकूर हा विभाग कोकण रेल्वे म्हणजे कोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड KRCL या कंपनीच्या अखत्यारीत येतो. कोकण रेल्वे मार्ग बनवताना मोठ्या प्रमाणात खर्च आला होता. मोठं मोठी पूल, बोगदे आणि इतर गोष्टीवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला होता. या खर्चाचा आकडा 3,555 कोटी रुपये एवढा आहे. हा खर्च वसूल करण्यासाठी कोकण रेल्वेला रेल्वे मंत्रालयाने अतिरिक्त भाडे आकारण्याची मुभा देण्यात आली होती. त्यानुसार रोहा ते ठोकूर दरम्यानचे अंतर प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी ४०% वाढवून दाखवून त्याप्रमाणात प्रवास भाडे आकारले जाऊ लागले. प्रवासी तिकिटांवर पण हेच अंतर छापले जाऊ लागले. उदाहरणार्थ रेल्वेने मुंबई सीएसएमटी ते मडगाव हे खरे अंतर ५८१ किलोमीटर एवढे आहे. मात्र प्रवाशांकडून हे अंतर ७६५ किलोमीटर असे दाखवून त्याचप्रमाणे भाडे आकारले जात आहे. यात रोहा ते मडगाव हे अंतर ४४० किलोमीटर एवढे आहे मात्र तिकीट आकारताना हे अंतर ६१६ एवढे दाखवून भाडे आकारण्यात येते.
खरे तर एकदा प्रकल्प निर्मितीचा खर्च वसूल झाला की अशा प्रकारची अतिरिक्त भाडे आकारणी बंद करून प्रचलित दराने भाडे आकारणी सुरु करण्याची गरज होती. कोकण रेल्वे गेली २५ वर्षे हे अतिरिक्त भाडे आकारत आहे. साहजिकच कोकण रेल्वे निर्मितीचा खर्च वसूल झालाच असेल मात्र KRCL ने ही वाढीव भाडे आकारणी चालूच ठेवली आहे. कठीण भौगोलिक स्थितीमुळे मोठा देखभाल खर्च होत असल्याने ही वाढीव आकारणी चालू ठेवली असल्याचे कोकण रेल्वेचे म्हणणे आहे.
सर्व गाड्यांना लागू
या कारणामुळे कोकण रेल्वे नेटवर्कमधून जाणाऱ्या सर्व गाड्यांचे भाडे वाढलेल्या अंतरावर मोजले गेले. उदाहरणार्थ, मंगळुरु सेंट्रल ते मुंबई एलटीटी अशी मत्स्यगंधा एक्सप्रेस एकूण 882 किमी अंतर पार करते, ज्यापैकी ठोकूर आणि रोहा दरम्यानच्या 760 किमी प्रवासासाठी वाढीव भाडे आकारले जाते. जर तुम्हाला मुंबई सीएसएमटी ते कणकवली पर्यंत प्रवास करायचा असेल तर त्यासाठी मडगाव पर्यंतचे प्रवास भाडे रेल्वे ला द्यावे लागते यावरून कोकण रेल्वेच्या प्रवाशांचा प्रवास इतर विभागातील रेल्वेच्या प्रवाशांशी तुलना करता महागाच म्हणावा लागेल.
Facebook Comments Box
Vision Abroad