भारतीय रेल्वे माहिती किंवा सुचना प्रसिद्धसाठी सोशल मीडिया चा मोठ्या प्रमाणात वापर करते. त्यात फेसबुक, ट्विटर ही माध्यमे वापरली जातात. त्याचबरोबर रेल्वेचा प्रत्येक विभाग स्वतःचे अधिकृत संकेतस्थळ याकरिता वापरते. या माध्यमातून रेल्वे संबधित माहिती उदा. मेगाब्लॉक, विशेष गाड्यांची घोषणा आणि ईतर माहिती प्रवाशांपर्यंत पोहोचवते. कोकण रेल्वे सुध्दा या माध्यमातून ही माहिती आपल्या प्रवाशांना देते. मात्र कोकणरेल्वे वर विशेष गाड्यां संबधित होणार्या घोषणा उशिराने होत असल्याची तक्रार प्रवाशांकडून होत आहे. कोकण रेल्वे माहिती प्रसिद्ध करेपर्यंत विशेष गाड्यांचे आरक्षणही चालू होऊन फुल्ल झालेले असते.
अगदी ताजे उदाहरण द्यायचे झाले तर काल कोकण रेल्वेने आपल्या संकेतस्थळावर आणि समाज माध्यमांवर प्रसिद्ध केलेल्या वास्को द गामा – मुझफ्फरपूर 07309/07310 विशेष गाडीच्या प्रसिद्धी पत्रकाचे (Press Note) चे देता येईल. या विशेष गाडीच्या फेर्या दिनांक 17 एप्रिल पासून सुरू होणार आहेत. मात्र कोकण रेल्वे प्रशासनाने या गाडीचे प्रसिद्धीपत्रक अगदी एक दिवस आधी म्हणजे 16 एप्रिल रोजी प्रसिद्ध केले आहे. तोपर्यंत या गाडीचे आरक्षण फुल होऊन प्रतीक्षायादी खूपच वर पर्यंत जावून पोचली आहे. कोकणच्या प्रवाशांना या गाडीची कल्पना नसल्याने या गाडीचा फायदा उत्तरप्रदेश तसेच पाश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना झाला आहे.
ही गोष्ट पहिल्यांदाच झाले असे नाही. असे प्रकार वारंवार घडत असल्याची तक्रार प्रवासी करत आहेत. पाश्चिम आणि मध्य रेल्वे ज्या विशेष गाड्या चालवते त्या गाड्यांची माहिती कोकण रेल्वे योग्य वेळेत आपल्या प्रवाशांपर्यत का पोहोचवत नाही असा प्रश्न विचारला जात आहे.
कोकण रेल्वे प्रशासनाला या गाड्यांची कल्पना नसते असे होऊच शकत नाही. कारण कोणतीही विशेष गाडी चालविण्यासाठी त्या योजनेत संबधित विभागाला सामील करून घेऊनच विशेष गाडी सोडण्यात येते. तर मग यामागचे कारण काय? प्रवाशांच्या सेवेपेक्षा आर्थिक फायदा बघून रेल्वे असे जाणूनबुजून तर करत नाही ना? अशी शंका प्रवाशांच्या मनात निर्माण झाली आहे.
अर्धवट माहिती का?
कित्येकदा रेल्वे प्रशासन विशेष गाड्यांची घोषणा तर करते मात्र आरक्षणाची तारीख जाहीर करत नाही. यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण होतो. विशेष गाड्यांची माहिती प्रसिद्ध करताना त्यासोबत आरक्षणाची तारीख ही जाहीर करण्यात यावी अशी प्रवाशांची मागणी आहे.
Vision Abroad