सावंतवाडी: प्रस्तावित नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या वाटेतील विघ्ने वाढत चालली आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी या महामार्गाला मोठया प्रमाणावर विरोध केला आहे. आता तर तळकोकणातही ज्या पट्ट्यातून हा महामार्ग जात आहे तो पट्टा ‘पर्यावरणीयदृष्टीने संवेदनशील’ क्षेत्र Eco Sensitive Zone जाहीर करण्याचे आदेश उच्च न्यायालायने सरकारला दिले असल्याने या महामार्गासमोरील सर्वात मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
प्रस्तावित महामार्ग आंबोली, कीतवडे,गेळे,वेर्ले, पारपोली, नेने, फणसवडे, उदेली, घारपी, फुकेरी,असनिये, तांबोळी, डेगवे, बांदा या गावातून जाणार आहे. मात्र यातील फणसवडे, उडेली, घारपी, फुकेरी,असनिये, तांबोळी ही गावे या इको सेन्सेटिव्ह झोन ESZ मध्ये येत आहेत. येथे वृक्षतोड करणे आणि महामार्ग बांधकामास मर्यादा येणार आहेत. त्यामुळे या महामार्गाच्या वाटेवरील अडचणी वाढल्या आहेत. या महार्गासाठी या भागातून नेण्यास मंजुरी मिळवणे खूप कठीण होणार आहे.
सावंतवाडी – दोडामार्ग तालुक्यातील २५ गावांच्या क्षेत्राला ‘पर्यावरणीयदृष्टीने संवेदनशील’ क्षेत्र Eco Sensitive Zone ESZ जाहीर करण्यात यावे असेच आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकार व केंद्र सरकारला दिले होते. त्यानुसार राज्य सरकार व केंद्र सरकारने २७ सप्टेंबर २०१३ मध्ये कॉरिडॉरचा हा भाग ‘पर्यावरणीयदृष्टीने संवेदनशील’ भाग म्हणून जाहीर करण्याचे आश्वासन न्यायालयाला दिले होते. मात्र गेल्या ११ वर्षात या आदेशांचे पालन झाले नसल्याने केंद्र व राज्य सरकारने केवळ न्यायालयाच्या आदेशाचा भंग केला नाही तर कर्तव्य पार पाडण्यातही ते अपयशी ठरल्याचे म्हणत न्यायालयाने ताशेरे ओढले होते.आता मात्र उच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि राज्य सरकारला सहा महिन्यांचा अल्टिमेटम दिला आहे. राज्य सरकारने चार महिन्यांत केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवावा. केंद्र सरकारने पुढील दोन महिन्यांत अंतिम अधिसूचना काढावी असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे.
सवांवाडी दोडामार्ग कॉरिडॉर दरम्यान २५ गावे येतात. सिंधदुर्गतील केसरी, फणसवडे , उडेली, दाभील- नेवली, सरंबळे, ओटावणे, घारपी, असनिये, फुकेरी, तांबोळी, कोनशी, भालावल, भेकुर्ली, कुंभवडे, खडपडे, तळकट, झोळंबे, कोलझर, शिरवळ, कुंब्रल, पांतुर्ली, भिके कोनाळ, कळणे, उगडे, पडवे माजगाव ही २५ गावे या कॉरिडॉर मध्ये मोडतात.या मार्गिकेतून अनेक वन्य प्राणी येजा करतात. याठिकाणी मोठ्याप्रमाणात जैवविविधता आहे. तसेच वनस्पतींच्या अनेक दुर्मिळ प्रजाती आहेत. मात्र या भागातून असे महामार्ग बनवताना मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होऊन जैवविविधतेची मोठी हानी होऊ शकते. या महामार्गामुळे पन्नास टक्के वन्यजीव विस्थापित होणार असल्याने येथील जनतेने याला विरोध केला पाहिजे, असे वनशक्ती संस्थेच्या स्टॅलिन दयानंद यांनी मत मांडले आहे.
Facebook Comments Box