कणकवली, दि. ०२ मे: कणकवली तालुक्यातील शिरवल गावाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेला एक बॅनर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक चर्चेचा विषय बनला आहे. “प्रचारास प्रवेश बंदी” असे या बॅनर वर लिहिले असून हा बॅनर येथील ग्रामस्थांनी लावला आहे.
“निषेध निषेध निषेध, प्रचारास प्रवेश बंदी, जो पर्यंत मुख्यरस्ता डांबरीकरण करून मिळत नाही, तोपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाने प्रचारासाठी येऊ नये” असे या बँनरवर लिहिण्यात आले आहे. गेली ३० वर्षे हा रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. गावाला तालुक्याशी जोडणारा हा एकमेव रस्ता असून त्याची सध्याची स्थिती खूपच खराब झाली आहे. या रस्त्यावरून प्रवास करणे अवघड झाले असून अपघाताची शक्यताही निर्माण झाली आहे. हा रस्ता मंजूर होऊनही गेले काही महिने प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली नाही आहे. विशेष म्हणजे कणकवली शहरापासून हा रस्ता फक्त ५ किलोमीटर अंतरावर असून याकडे दुर्लक्ष होत असून हे सर्व सहनशक्तीच्या पलीकडचे आहे. त्यामुळे अशा आशयाचा बॅनर येथे लावला असे ग्रामस्थानी पत्रकारांशी बोलताना सांगितले. जो पर्यंत मुख्यरस्ता डांबरीकरण करून मिळत नाही, तोपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाने गावात प्रचारासाठी येऊ नये अशी ताकीदच गावकऱ्यांनी दिली आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad