सावंतवाडी, प्रतिनिधी: गर्दीच्या स्थानकांत गाडयांना थांबे दिलेत कि प्रवासी संख्या वाढते आणि परिणामी त्या स्थानकाचे उत्पन्न वाढते हे सरळ गणित आहे. गेल्या वर्षी गोवा आणि दक्षणेकडील काही स्थानकावर गाडयांना थांबे मंजूर झालेत, त्यांचे फलित म्हणून त्या त्या स्थानकाचे उत्त्पन्न चांगल्या टक्क्यांनी वाढले. गोव्याच्या कानाकोना या स्थानकावर गांधीधाम-नागरकोईल आणि नेत्रावती या गाड्यांचे थांबे मंजूर करण्यात आले. त्याचा चांगला परिणाम होऊन त्या स्थानकांच्या उत्पन्नात २३२% भरीव वाढ झाली. तर बारकुर या स्थानकावर मत्यगंधा या गाडीला थांबा देण्यात आला. त्या स्थानकाचे उत्पन्न सुमारे ४४% वाढले.
मात्र गरज आणि मागणी असूनही कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी (टर्मिनस) स्थानकावर गेल्या काही वर्षात गाडयांना थांबे न देऊनही या स्थानकांच्या उत्पन्नात चांगली वाढ झाल्याची दिसत आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात प्रवासी संख्येत आणि उत्पन्नात अनुक्रमे १२% आणि ९% इतकी वाढ झाली. मागणी आणि गरज असूनही एकाही गाडीला येथे थांबा दिला नसताना ही वाढ झाली ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. काही नियमित गाडयांना येथे थांबे दिले असते तर या स्थानकापासून मिळणाऱ्या उत्पन्नात जवळपास ३०% ते ५०% ने वाढ झाली असती असे रेल्वे अभ्यासकांचे मत आहे.
सावंतवाडी स्थानकांच्या टर्मिनस चे काम रखडले आहे. अनेक सुविधांचा अभाव आहे. स्थानकाचे बाहेरून सुशोभीकरण करण्याचे काम चालू आहे. ही एक चांगली गोष्ट आहे पण काही मूलभूत बाबींचा पण विचार करणे गरजेचे आहे. येथील प्लॅटफॉर्म वर पुरेशा प्रमाणात निवारा शेडची सोय नाही; त्यामुळे पावसाळ्यात प्रवाशांचे हाल होत आहेत. इतर स्थानकावर गाड्यांचे थांबे सहज मंजूर होत असताना येथे अत्यंत गरज असताना वारंवार आंदोलने, मागण्या करूनही थांबे का मंजूर होत नाही आहेत हा एक यक्षप्रश्नच म्हणावा लागेल.
Facebook Comments Box
Vision Abroad