कोल्हापूर : विद्यमान सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जाणारा नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या वाटेतील अडचणी दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. आता तर चक्क सत्तेत रूढ असलेल्या महायुतीतील नेत्यांनी या महामार्गाला विरोध केला असल्याने या प्रकल्प रद्द होण्याच्याच शक्यता वाढल्या असल्याचे बोलले जात आहे.
समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर नागपूर आणि गोव्याला जोडणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापुरातील महायुतीच्या नेत्यांनीच विरोध केला आहे. महायुतीचे पराभूत उमेदवार संजय मंडलिक, पालकमंत्री हसन मुश्रीफ, भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्यापाठोपाठ आता भाजपचे नेते समरजीतसिंह घाटगे यांनीही सोमवारी महामार्गाला विरोध असल्याचे जाहीर केले.
जिल्ह्यातील कागलसह सहा विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या जमिनी मोठ्या प्रमाणात जात असल्याने त्यांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. शक्तिपीठ महामार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांसमवेत बामणी (ता. कागल) येथे घाटके यांनी सोमवारी बैठक घेतली. कागल तालुक्यातील सर्वाधिक ५०० एकर जमीन महामार्ग व अन्य सुविधांसाठी अधिग्रहित करण्यात येणार आहे. या जागेचीही घाटगे यांनी पाहणी केली.
‘शक्तिपीठ’मुळे पराभव?
संजय मंडलिक यांनी आपल्या पराभवामागे शक्तिपीठ महामार्ग हे एक कारण असल्याचे म्हटले आहे. मुश्रीफ यांनीही याचा लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसल्याचे म्हटले आहे. हा प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
काहीच महिन्यात विधानसभा निवडणुका होणार असून पुन्हा शेतकऱ्यांचा नाराजीचा फटका सरकारला बसू शकतो, त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेऊन हा महामार्ग रद्द करावा अशी मागणी महायुतीतील नेत्यांकडून होत आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad