Fact Check: सोशल मीडियावर सध्या एका बातमीचे कात्रण मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या कात्रणामध्ये दावा करण्यात आला आहे की भारतीय रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांसाठी तिकिटांमध्ये सवलत पुन्हा सुरू केली आहे. या बातमीनुसार 60 वर्षांवरील पुरुषांसाठी 40 टक्के आणि 58 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी 50 टक्के रेल्वेच्या प्रवास भाड्यात सवलत देण्यात आली आहे.
मात्र खोलवर चौकशी केली असता असे आढळले की या बातमीत केलेला दावा खोटा असून असा कोणताही निर्णय भारतीय रेल्वे किंवा रेल्वे मंत्रालयाने जाहीर केलेला नाही.
देशातील एका अग्रगण्य इंग्रजी वृत्तपत्राने रेल्वे मंत्रालयाचे एडीजी जनसंपर्क राजीव जैन यांच्याशी संपर्क साधला असता जैन यांनी या बातमीला “फेक न्यूज” म्हणत स्पष्टपणे नकार दिला. ते म्हणाले, “असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, 1 जुलैपासून सवलतींमध्ये कोणताही बदल होणार नाही. फक्त सध्याच्या सवलती सुरू राहतील.”
या वर्षी 19 मे रोजी आयआयटी मद्रास येथे पत्रकारांशी बोलताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले होते कि ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलत पुन्हा सुरू करता येणार नाही कारण रेल्वे आधीच सवलतीच्या दराने कार्यरत आहे.
ही अफवा कोणी सुरू पसरवली ?
“रेल मेल” नावाच्या एका फेसबुक पेजने एका पोस्टमध्ये दावा केला आहे की भारतीय रेल्वे 1 जुलैपासून वृद्धांसाठी सवलत पुन्हा सुरू करणार आहे. तथापि, फेसबुक पेजने नंतर आपला दावा मागे घेतला आणि त्याच्या चुकीबद्दल माफी मागितली. मात्र ही बातमीचे कात्रण अजूनही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याने अफवा पसरत आहेत.
20 मार्च 2020 पासून कोरोना काळात रेल्वेने दिव्यांगजनांच्या केवळ चार श्रेणी, रुग्णांच्या आणि विद्यार्थ्यांच्या 11 श्रेणींचा अपवाद वगळता इतर सवलती अनिश्चित काळासाठी बंद केल्या आहेत. या वर्षी मार्चमध्ये, रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत सांगितले की, ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या सवलती बहाल करण्याची मंत्रालयाची कोणतीही योजना नाही.
Facebook Comments Box