Konkan Railway News : दिवसेंदिवस वाढणारी प्रवासीसंख्या पाहता कोकण रेल्वे मार्गावर नवीन गाड्या चालविण्यात याव्यात यासाठी मोठी मागणी होत आहे. मात्र सिंगल रेल्वे रूळामुळे सध्या या मार्गावर गाड्या वाढवणे शक्य होत नाही. त्यामुळे याा मार्गाच्या दुहेेरीकरणाचा प्रस्ताव आला होता. परंतू या मार्गावर नैसर्गिक मर्यादा असल्याने आता ‘पॅच डबलिंग’ करण्याचा निर्णय कोकण रेल्वे महामंडळाने घेतला आहे. तसा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे पाठवला असल्याची माहिती कोकण रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
पॅच डबलिंग म्हणजे काय?
पॅच डबलिंग म्हणजे संपूर्ण मार्ग दुपदरीकरण न करता ज्या भागात शक्य आहे त्या भागांत दुहेरीकरण करणे. कोकण रेल्वे मार्ग कित्येक बोगद्यातून आणि पुलांवरून जात आहे. हे बोगदे आणि पुले सिंगल रूळांसाठी बांधण्यात आली आहेत. मार्गाचे दुपदरीकरण करताना या मार्गावर पुन्हा बोगदे पाडावे लागतील किंवा शक्य आहे तिथे रुंदीकरण करावे लागेल. नवीन पुले उभारावी लागतील. या गोष्टी खर्चिक आहेत. सपाट भागात मार्गाला दर किमी मागे 15 ते 20 कोटी तर डोंगराळ भागात दर किमीला 80 ते 100 कोटी इतका दुपदरीकरणाचा खर्च आहे. भविष्यात या गोष्टी कराव्याच लागतील मात्र सध्या ‘पॅच डबलिंग’ करून चांगल्या प्रमाणात कोकण रेल्वे मार्गावरील ताण कमी करणे शक्य होईल.
पॅचेसच्या स्वरुपात दुपदरीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. सपाट आणि बोगदे नसलेल्या अशा 350 किमी मार्गापैकी काही पॅचेसवर दुपदरीकरण करण्याची योजना आहे.
कोकण रेल्वे मार्गावर गाड्या वाढविण्यासाठी अनेक मागण्या होत आहेत. मात्र कोकण रेल्वे आपल्या पूर्ण क्षमतेने चालविण्यात येत असून नवीन गाडी चालवणे शक्य नसल्याचे असे रेल्वे कडून उत्तर येत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या मार्गावरील बहुतेक गाड्या खासकरुन कमी पल्ल्याच्या गाड्या आपले वेळापत्रक पाळत नाही आहेत. पॅच डबलिंग या समस्या सुटणार आहेत. त्याचबरोबर नवीन गाड्या चालविणे शक्य होणार आहे.
Vision Abroad