सिंधुदुर्ग: सावंतवाडी टर्मिनसच्या सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र सुशोभीकरणात प्रवेशद्वारावर स्थानकाच्या नावाचा चुकीचा बोर्ड लावल्याने नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. प्रवेशद्वारावर “सांवतवाडी टर्मिनस” असा बोर्ड न लावता “सावंतवाडी रोड” असा बोर्ड लावल्याने तळकोकणातील जनतेत संतापाची लाट उसळली आहे. या प्रकाराबद्दल प्रवासी रेल्वे संघटना देखील सक्रिय झाल्या असून याबद्दल त्यांनी आपला निषेधही नोंदविला आहे. प्रशासनाने त्वरीत हा बोर्ड हटवून सावंतवाडी टर्मिनस असा बोर्ड लावावा अशी मागणी केली आहे.
सावंतवाडी रेल्वे टर्मिनस चे भूमिपूजन 9 वर्षापूर्वी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते झाले होते. मात्र मा. सुरेश प्रभू यांचा केंद्रीय रेल्वेमंत्रिपदावरून पायउतार होताच हे काम रखडले ते आजतायगत पूर्ण झाले नाही. रेल्वे प्रवासी संघटनांनी या दरम्यान कित्येकदा आवाज उठवला, मात्र त्याच्या हाती पोकळ आश्वासनांशिवाय काहीच आले नाही. आता तर स्थानकाच्या नावातून “टर्मिनस” हा शब्द कायमचा हटवण्याचा प्रयत्न होत आहे. विशेष म्हणजे सावंतवाडी टर्मिनस चे भूमिपूजन ज्या सरकारच्या कार्यकाळात झाले होते तेच सरकार आता सत्तेत असताना हा प्रकार होत असल्याने तळकोकणातील प्रवाशांच्या मनात सरकारविषयी आणि लोकप्रतिनिधींविषयी चीड निर्माण होत आहे.
टर्मिनस समस्त कोकणकरांसाठी फायद्याचे
सावंतवाडी टर्मिनस होणे हे फक्त सावंतवाडी पंचक्रोशीतील प्रवाशांसाठीच नाही तर समस्त कोकण प्रवाशांसाठी फायद्याचे ठरणार आहे. कारण हे टर्मिनस झाले तर वसई/बोरिवली – सावंतवाडी, पुणे – सावंतवाडी, कल्याण – सावंतवाडी या महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी सोयीच्या ठरणाऱ्या गाड्या सोडणे शक्य होणार आहे . त्याचबरोबर गणेश चतुर्थी, होळी या सारख्या सणांसाठी कोकणात सोडण्यात येणाऱ्या विशेष गाड्या दक्षिणेकडे न पाठवता सावंतवाडी पर्यंत मर्यादित करणे शक्य झाले असते. त्यामुळे सध्या गुरं ढोरांसारखा प्रवास करण्याऱ्या कोकणकरांचा प्रवास चांगल्या प्रमाणात सुखकर झाला असता.
Follow us on

Follow us on




Facebook Comments Box