सिंधुदुर्ग :मागील ९ वर्ष सावंतवाडी टर्मिनसचे काम रखडले आहे. किती जनआंदोलने झालीत तरी रेल्वे प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी यात रस दाखवला नाही. टर्मिनस म्हणुन भूमिपूजन झाले असतानाही रेल्वे आपल्या रेकॉर्डमध्ये जाणून बुजून या स्थानकाचे नाव ”सावंतवाडी रोड” असेच दाखवत आले आहे. परवा तर हद्द पार झाली आणि सुशोभीकरणा दरम्यान प्रवेशद्वारावर लावलेल्या फलकावर ”सावंतवाडी रोड” अशा नावाचा फलक लावण्यात आला. हेच जर करायचे होते तर टर्मिनस म्हणुन भूमिपूजन फक्त मते मिळविण्यासाठी केले का? असा संतप्त सवाल कोकणी जनतेकडून विचारला जात आहे.
नियतीला कदाचित हे पटले नसावे म्हणा की अन्य काहीही म्हणा, सावंतवाडी येथे टर्मिनस का असावे हे तिने या घटनेच्या दुसर्याच दिवशी दाखवले. पेडणे येथील एका बोगद्यातून पाण्याचा मोठा पाझर फुटून तेथील मार्ग बंद झाला आणि कोकण रेल्वेची वाहतुक विस्कळीत झाली. 30 तास झाले तरी हा बोगदा वाहतुकीसाठी चालू झाला नाही. त्यामुळे अनेक गाड्या रखडल्या. मार्ग बंद झाल्याने अनेक गाड्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानकांवर उभ्या करून ठेवण्यात आल्यात. अनेक गाड्या रद्द झाल्यात, कित्येक प्रवासी अडकून पडलेत यात प्रवाशांचे अतोनात हाल झाले.
जर सावंतवाडी टर्मिनसचे काम पूर्ण झाले असते तर…
जर सावंतवाडी टर्मिनसचे काम पूर्ण झाले असते तर खूप मोठा फरक पडला असता. परवा दिनांक ०९ जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्हय़ात अडकलेल्या गाड्या निदान सावंतवाडी स्थानकापर्यंत चालविता आल्या असत्या आणि तेथूनच दुसर्या दिवशी मुंबईच्या दिशेने पाठवता येवू शकल्या असत्या. टर्मिनसच्या अपुर्या कामामुळे फक्त 1/2 गाड्या येथून परस्पर सोडता आल्या असत्या. काल संध्याकाळ पासून संध्याकाळपासून पनवेल ते सावंतवाडी मार्ग वाहतुकीसाठी उपलब्ध आहे. अनेक गाड्या सावंतवाडी स्थानकापर्यंत चालवणे शक्य झाले असते आणि प्रवाशांचे हाल वाचवता आले असते.
कोल्हापूर वैभववाडी रेल्वेमार्ग सुद्धा तितकाच महत्वाचा..
सावंतवाडी टर्मिनस प्रमाणेच केंदीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या कारकीर्दीत मंजूर झालेले आणि रखडलेले दुसरे काम म्हणजे कोल्हापूर- वैभववाडी रेल्वे मार्ग. पाश्चिम महाराष्ट्राला कोकणाशी जोडणारा हा रेल्वेमार्ग सुरेश प्रभू केंदीय रेल्वे मंत्री असताना मंजूर झाला होता. मात्र त्याचीही गत सावंतवाडी टर्मिनसच्या कामासारखी झाली. सुरेश प्रभू यांचा केंदीय रेल्वे मंत्री पदावरून पायउतार होताच हे कामही रखडले. त्यानंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या कोणत्याही अर्थसंकल्पात या मार्गासाठी तरतुद केली जात नसल्याने त्याचे काम थांबले आहे. हा रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यास आणीबाणीच्या काळात कोकण रेल्वे मार्गाला एक पर्यायी मार्ग म्हणून हा मार्ग वापरता येवू शकतो.
माजी केंदीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी मंजूर केलेली ही दोन महत्त्वाची कामे रखडली आहेत…या मागे कोणतीही कारणे असूद्यात ..सध्या कोकणातील प्रवाशांना कोणी वाली नाही हे जवळपास अधोरेखित झाले आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad