Follow us on




सावंतवाडी, दि. १५ जुलै :काल नातुवाडी (खेड) बोगद्याजवळ दरड कोसळल्याने पूर्ण कोकण रेल्वे ठप्प झाल्याने या मार्गावरील रेल्वे गाड्या ह्या विविध स्थानकावर थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. या गाड्यांत कित्येक प्रवासी अडकून पडले होते. १२२०२ गरीब रथ एक्स्प्रेस ही सावंतवाडी स्थानकात थांबवली होती. त्या गाडी ने प्रवास करणारे प्रवासी (एकूण प्रवासी ७०० पेक्षा अधिक) हे स्थानकावर असलेल्या अपुऱ्या खान -पानाच्या सुविधेमुळे त्रस्त झालेले होते, ट्रेन मधले पाणी देखील संपले होते, अशातच कोकण रेल्वे प्रवासी संघटना त्यांच्या मदतीला आली.
कोकण रेल्वे संघटना, सावंतवाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सावंतवाडी स्थानकावर पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. लगेचच त्यांनी कोकण रेल्वेच्या जन संपर्क अधिकाऱ्याला फोन करून गरीब रथ एक्स्प्रेस मधे पाणी भरायला लावले. लगेच अँब्युलन्सची देखील व्यवस्था संघटनेने केली. आणि सर्व लोकांना या प्रवाशांचा मदतीसाठी धावून या असे आवाहन देखील केले, त्या आवाहनाला लोकांनी चांगला प्रतिसाद देऊन जेमतेम रक्कम १०,००० रुपये जमा झाले.या रक्कमेतून गरीबरथ एक्स्प्रेस मधील प्रवाशांसाठी ६०० पेक्षा जास्त पाण्याच्या बॉटल्स (१ लिटर), बिस्किटे, आदी असे सुमारे ७०० लोकांना पुरणारे समान स्थानकावर जाऊन कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी च्या पदाधिकाऱ्यांनी वाटप केले, त्यावेळी प्रवाशांना धीर देण्यात आला, संघटनेच्या कामाबाबत माहिती देण्यात आली.
यावेळी संघटनेचे सचिव मिहिर मठकर, संपर्क प्रमुख भूषण बांदिवडेकर, खजिनदार विहंग गोठोसकर,राज पवार आदी उपस्थित होते.