राजापूर: अर्जुना नदीवर बांधण्यात आलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील सर्वाधिक उंचीच्या पुलाला राजापूरचे पहिले राज्यमंत्री (कै.) ल. र. तथा भाई हातणकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखेच्यावतीने पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती. त्याप्रमाणे महामार्गावरील अर्जुना नदीवरील पुलाला भाई हातणकर यांचे नाव देण्याचा ठराव जिल्हा नियोजन समिती बैठकीमध्ये झाला असून, त्याची लवकरच अंमलबजावणी होणार आहे. अशी माहिती कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा राजापूरचे अध्यक्ष आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य दीपक नागले यांनी दिली आहे.
मुंबई – गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात राजापूर शहरानजीक शीळ-कोंढेतड या दरम्यान अर्जुना नदीवर उभारण्यात आलेल्या सर्वाधिक उंचीच्या पुलाचे काम पूर्ण झाले आहे.नोव्हेंबर २०१८ मध्ये या पुलाची प्रत्यक्ष उभारणी सुरू झाली होती. मात्र, भूसंपादनातील अडचणी आणि कोरोना काळातील शिथिलता यामुळे हा पूल मार्गी लागण्यास मे २०२२ उजाडले हा पूल राजापूर आगार सारंगबाग मार्गे थेट डोंगरतिठा असा जोडला गेला आहे. या दरम्यानची जवळजवळ ११ धोकादायक वळणे कमी होऊन सुमारे १ किलोमीटर अंतर कमी झाले आहे. अर्धा नदीपात्रात आणि अर्धा जमिनीवर असा हा महामार्गावरील पहिला आणि एकमेव पूल आहे.
Facebook Comments Box