पुणे: ऑनलाइन विडिओ गेम मुळे एका १६ वर्षाच्या मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे. पिंपरी चिंचवड येथील किवळे या भागात ही घटना घडली आहे. या गेममध्ये बाल्कनीतून उडी मारायचा एक टास्क होता. तो फॉलो करायच्या नादात या मुलाचा जीव गेला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.
दिनांक 25 जुलै रोजी सुट्टी असल्या कारणाने सदर मुलगा बेडरूम मध्ये लॅपटॉपवर ऑनलाईन गेम खेळत होता. दुपारी एकच्या सुमारास सोसायटीच्या ग्रुपवर एक मुलगा रक्ताच्या थारोळ्यात खाली पडल्याचा मेसेज आला. मुलाच्या आईला शंका आली म्हणून ती मुलाच्या खोलीत गेली असता तो मुलगा तिथे आढळला नाही. त्यानंतर खाली पाहिले तर तो रक्ताच्या थारोळ्यात खाली पडलेला दिसला. मुलाला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता
घरात गेममध्ये असलेल्या कोडची काही कागदपत्रं सापडली आहेत. त्यात उडी मारणं असा टास्क होता. प्राथमिक तपासानुसार हा मुलगा मोठ्या प्रमाणात गेम्स खेळत होता असं निष्पन्न झालं आहे.आत्महत्येआधी मिळालेल्या चिठ्ठीनुसार XD नावाचा एक गेम आहे असं दिसतंय. यासंबंधी आमचे अधिकारी पुढील तपास करत आहे. असं पोलीस म्हणाले.तसेच त्याच्या खोलीतून काही स्केचेस सापडले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे त्याने इमारतीवरुन उडी मारण्यापूर्वी स्वत:च्या मृत्यूचा प्लान आखला होता. त्याने पेन्सिलिने याचे स्केच तयार केले होते. तेही पोलिसांनी जप्त केले आहेत.
दरम्यान, मोबाइल वापरताना पॅरेंटल कंट्रोल आणि डिजिटल वेलबिंग नावाच्या अॅपचा वापर करून आपल्या मुलांचा स्क्रीनटाइमचा वापर मर्यादित करा, आणि आपली मुलं काय पाहतात यावर लक्ष ठेवायला हवं, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
या मुलाच्या आईने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं, “गेल्या सहा महिन्यापासून त्याचं वागणं बदललं होतं. त्याच्या हातून लॅपटॉप घेतला की तो एकदम आक्रमक व्हायचा. तो अगदी लहानसहान गोष्टींना घाबरायचा. तो अचानक मला चाकू मागायला लागला. आगीला तो घाबरेनासा झाला. तो हे पाऊल उचलेल असं मला कधीही वाटलं नव्हतं. सरकारने याबद्दल काळजी घ्यायला हवी. कारण मुलांना काहीच कळत नाही त्यामुळे मुलांपर्यंत या गोष्टी पोहोचू नयेत याची काळजी सरकारने घेणं आवश्यक आहे. VPN वर सगळं दिसू शकतं. माझ्या मुलाबरोबर जे झालं ते इतरांबरोबर होऊ देऊ नका, सगळ्यांना सुरक्षित नेटवर्क पोहोचवा. माझी सरकारलाही कळकळीची विनंती आहे.”
मुलाच्या वडिलांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, “मुलांना आजकाल सगळं समजतं. पॅरेंटल कंट्रोल असला तरी मुलं तो कोड सहज क्रॅक करतात. बरेचदा मुलं ऑनलाइन अभ्यास करण्याच्या नादात लॅपटॉपवर बसतात. त्यामुळे ते नक्की तिथे काय पाहतात हे समजत नाही कारण हिस्ट्रीसुद्धा डिलिट करतात. पालकांना मुलांवर 24 तास लक्ष ठेवणं शक्य नाही.
मुलगा कोणता गेम खेळत होता हे अद्याप आई वडिलांना आणि पोलिसांनाही नीटसं कळलेलं नाही.
त्याबद्दल अधिक तपास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Vision Abroad