



Railway Accident Chakradharpur: आज पहाटे हावडा-मुंबई मेल एक्स्प्रेस ट्रेनचा भीषण अपघात झाला आहे. हावडा-मुंबई मेल एक्सप्रेस (१२८१०) रुळावरून घसरून एक मालगाडीला धडकले. या अपघातात तीन जण ठार तर अनेक जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी बचाव पथक पोहचले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालायत दाखल करण्यात आले आहे.
हा अपघात राजखरसवां वेस्ट आऊट आणि बाराबम्बो दरम्यान झाला. हावडा-मुंबई मेल एक्सप्रेस (१२८१०) हीचे १८ डब्बे रुळावरुन घसरले. भल्या पहाटे ३:४५ मिनिटांनी हा अपघात झाला. दक्षिण-पूर्व रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे अनेक डब्बे रुळावरुन उतले आहेत. जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात येत आहेत. तर काहींना चक्रधरपूर येथे हलविण्यात आले आहे.
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात आतापर्यंत ३ जणांच्या मृत्यूची माहिती मिळत आहे. तर १५० हून अधिक प्रवासी जखमी झाल्याचे समोर येत आहे. चालकाच्या प्रसंगावधानाने अनेकांचे प्राण वाचल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. या अपघाताची जाणीव होताच चालकाने रेल्वेचा वेग कमी केला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. नाहीतर आज मृतांचा आकडा मोठा असता. चक्रधरपूर रेल्वे मंडळात याविषयीचा अलर्ट मिळाल्याने एकच गोंधळ उडाला.