वाचकांचे व्यासपीठ: खरेतर देशाला आपले सर्वस्व समर्पित केलेल्या महान नेत्यांची तुलना करणे चुकीचे आहे. मात्र जेव्हा एखाद्या नेत्याच्या कर्तृत्वाचा सन्मान होत नाही, त्याची अवहेलना केली जाते तेव्हा नाईलाजाने त्या व्यक्तीने केलेल्या कार्याचे महत्व पटवून देण्यासाठी ही तुलना होतेच.
स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर या दोन्ही कालखंडात प्रा. मधु दंडवते यांचे देशासाठी दिलेले योगदान अतुलनीय असेच आहे. १९४२ च्या चळवळीमध्ये त्यांनी आणि त्यांच्या पत्नी प्रमिला दंडवते यांनी आंदोलनात भाग घेऊन स्वातंत्र्यासाठी योगदान दिले आणि करावासही भोगला होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गोवा सत्याग्रहामध्येसुद्धा त्यांनी भाग घेतला होता त्यादरम्यान त्यांना पोर्तुगीज पोलिसांकडून एवढी मारहाण झाली की त्यांच्या शरीरातली हाडे मोडली होती व त्या जागी स्टीलच्या पट्या घातल्या होत्या. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या आंदोलनामध्ये दोघा पती पत्नीने आपले योगदान देऊन कारावास भोगला होता. देशात जेव्हा आणीबाणी जाहीर झाली होती तेव्हा लालकृष्ण अडवाणी यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांना अटक झाली होती. त्यात अटकेत प्रा. मधु दंडवते
आणि त्यांच्या पत्नींचाही समावेश होता.
भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना त्यांच्या त्यागासाठी आणि देशसेवेसाठी भारतरत्न देऊन गौरवण्यात आले. त्यांनी केलेली देशसेवेबद्दल तिळमात्र शंका नाही. मात्र त्यांच्या बरोबरीने किंबहुना त्यांच्यापेक्षा जास्तच देशसेवा केलेल्या मधू महानेत्याच्या त्यागाचा, कार्याचा सन्मान होणे गरजेचे आहे. लालकृष्ण अडवाणी यांनी फक्त आणीबाणी मध्ये तुरुंगवास भोगला परंतु प्रा. मधु दंडवते यांनी स्वातंत्र्य चळवळीसह गोवा सत्याग्रह संयुक्त महाराष्ट्र आंदोलन यामध्ये तुरुंगवास भोगला मग प्रा. मधु दंडवते यांना भारतरत्न का दिला जाऊ नये?
केंदीय रेल्वे मंत्री असताना त्यांनी भारतीय रेल्वेमध्ये अमुलाग्र बदल केलेत. ६ डब्याच्या ऐवजी २२ डब्याच्या मेल एक्सप्रेस सुरू करून तिकिटांचा होणारा काळाबाजार त्यांनी रोखला. भारतीय रेल्वेच्या प्रत्येक गाडीला वेगळे नाव देण्याची सुरवात त्यांनीच केली. त्याची सुरुवात पहिली कलकत्त्या वरून मुंबईला येणाऱ्या ” गीतांजली” एक्सप्रेस या नावाने सुरुवात झाली. विशेष म्हणजे, त्यांनी दुय्यम दर्जाच्या स्लीपर कोचच्या प्रवाशांसाठी, अधिक आरामदायी प्रवासासाठी विद्यमान लाकडी बर्थ बदलून, उशी असलेले बर्थ सुरू केले. सुरुवातीला प्रमुख ट्रंक लाईन्समध्ये लागू केले जात असताना, 1980 च्या दशकाच्या अखेरीस सर्व गाड्यांमध्ये त्यांच्या द्वितीय श्रेणीच्या डब्यांमध्ये हे पॅड बर्थ होते. कोकण रेल्वे प्रत्यक्षात येण्यासाठी प्रा. मधु दंडवतेंनी रेल्वेमंत्री म्हणून सादर केलेल्या पहिल्या अर्थसंकल्पातच तरतूद केली. कोकण रेल्वे प्रत्यक्षात साकारण्यासाठी त्यांचे योगदानही सर्वश्रुत आहे.
एवढं मोठे भारताला योगदान देणाऱ्या या तपस्वी देशभक्ताला त्याच्या मृत्युपश्चात जर भारतरत्न देता येत नसेल तर किमान सावंतवाडी रेल्वे स्टेशनचे टर्मिनस म्हणून तात्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन केलेल्या या टर्मिनस चे काम पूर्ण करून त्याला मधु दंडवते टर्मिनस असे नाव देण्यात यावे अशी मागणी मागील ३ वर्षांपासून मोठ्याप्रमाणात होत आहे. मात्र या मागणीला वेळोवेळी केराची टोपली दाखवली जात आहे. भारतरत्न पदासाठी योग्य असलेल्या एका महानेत्याची मरणोत्तर अशी अवहेलना होत असेल तर त्यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते?
स्वातंत्र्य चळवळीसह गोवा सत्याग्रह आणीबाणी मध्ये सहभाग घेणाऱ्या प्रमिला दंडवते यांनी महिला आयोगाची स्थापना करून संपूर्ण भारतातील महिलावर खूप मोठे उपकार केले आहे त्यांच्याही यथोचित सन्मान व्हावा असे मी जाहीर पत्रकाद्वारे मागणी करीत आहे विलंबित सावंतवाडी टर्मिनस चे काम लवकरात लवकर पूर्ण करून त्या टर्मिनसला मधु दंडवते यांचे नाव देण्यात यावे. हे वर्ष प्रा. मधु दंडवते यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे तरी येत्या २१ जानेवारी २०२५ रोजी मधु दंडवते यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता आहे तरी लवकरात लवकर सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे काम पूर्ण करून २१ जानेवारी २०२५ पुर्वी मधु दंडवते टर्मिनस असे नामांतर करून या थोर विभूतीला आदरांजली अर्पण करावी
श्री. सुरेंद्र हरिश्चन्द्र नेमळेकर
संस्थापक सदस्य – कोकण रेल्वे,
सल्लागार- सखांड कोकण रेल्वे सेवा समिती
संस्थापक सदस्य – कोकण रेल्वे,
सल्लागार- सखांड कोकण रेल्वे सेवा समिती
Facebook Comments Box