सावंतवाडी: सावंतवाडी स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. सावंतवाडी रेल्वे स्थानकावर प्रवासी तिकीट आरक्षण खिडकी आता सकाळी ८ ते संध्याकाळी ८ अशी १२ तास खुली राहणार आहे. या आधी ती सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत खुली असायची. आता ती १२ तास खुली राहणार असल्याने प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.
प्रवासी संघटनेच्या प्रयत्नांना यश
खरेतर सावंतवाडी रेल्वे स्थानकावरून आंबोली-चौकुळ, कलंबिस्त-शिरशिंगे, शिरोडा, रेडी , दोडामार्ग आणि वेंगुर्ल्यातील गावे अशा मोठ्या पट्ट्यातील प्रवासी प्रवास करतात. अर्धवेळ तिकीट आरक्षण खिडकीमुळे दुरून येणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असे. त्यामुळे या स्थानकावरील आरक्षण खिडकी पूर्णवेळ चालू करावी अशी मागणी येथील कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी तर्फे करण्यात येत होती. दिनांक ९ ऑगस्ट रोजी सुशोभीकरणाच्या कार्यक्रमात खासदार नारायण राणे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी हजेरी लावली होती. यावेळी संघटनेच्या विविध मागण्याचे निवेदन सादर करून त्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या अशी विनंती केली गेली होती. या निवेदनात स्थानकावरील आरक्षण खिडकी पूर्णवेळ सुरु करावी या मागणीचा समावेश होता. त्यांच्या विनंतीला मान देऊन खासदार नारायण राणे यांनी रेल्वे प्रशासनाला तशा सूचना दिल्या होत्या. त्यामुळे प्रवासी संघटनेने त्यांचे आभार मानले आहेत.
Facebook Comments Box