”…. नाहीतर कोकणात येणारा एकही नवीन महामार्ग होऊ देणार नाही” जनआक्रोश समितीचा ईशारा

   Follow us on        

रायगड – १७ वर्षांपासून रखडलेला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि त्यातच पावसाळ्यात झालेली दुरावस्था याकडे सरकारचे लक्ष केंद्रित करण्याकरिता जनआक्रोश समितीने माणगाव येथे आमरण उपोषण आंदोलन सुरू केले असून आधी हा महामार्ग पूर्ण करा नाहीतर कोकणात येणारा एकही नवीन महामार्ग होऊ देणार नाही, असा इशाराच राज्य सरकारला कोकणवासियांनी दिला आहे.

माणगावमध्ये समितीच्या वतीने निषेध रॅली काढण्यात आली. यामध्ये माणगावसह कोकणातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर निघालेल्या रॅलीमध्ये सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत महामार्ग रोखून धरण्यात आल्याने काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र पोलिसांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर महामार्गावरील आंदोलन स्थगित करत नियोजित जागेवरती आमरण उपोषण सुरू करण्यात आले.

हा महामार्ग केव्हा पूर्ण होईल याबाबत खुद्द मुख्यमंत्र्यांकडून लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या महामार्गाच्या दुरावस्थेमुळे झालेल्या अपघातात जे मृत्यूमुखी पडले त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कसलेही आर्थिक सहाय्य केले जात नाही, अपघातात जखमी झालेल्यांना सहाय्य केले जात नाही याबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. कोकणातील नागरिकांची उपजीविका पर्यटनावरती अवलंबून आहे मात्र रस्ता खराब असल्याने पर्यटकांनी कोकणाकडे पाठ फिरवली आहे त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला असल्याने त्याची नुकसान भरपाई राज्य सरकारने करून द्यावी, यासह विविध चौदा मुख्य मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

संजय यादवराव, रुपेश दर्गे, अजय यादव, संजय जंगम,पराग लाड, सुरेंद्र पवार, प्रशिल लाड, आशिष बने, अनिल जोशी यांनी या आंदोलनाची हाक दिली असून त्यास मावळ प्रतिष्ठान, बजरंगदलसह अनेक सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. माणगावचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार, माजी नगराध्यक्ष आनंद यादव, रिक्षाचालक मालक संघटनेचे अध्यक्ष अण्णासाहेब साबळे, उद्योजक शेखर गोडबोले यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आमरण उपोषणास उपस्थित राहून पाठींबा व्यक्त केला.

नवीन महामार्ग होऊ देणार नाही – यादवराव

गणेशोत्सव आणि शिमगा हे कोकणवासियांचे प्रमुख सण आहेत. या सणाला कोकणी माणूस यायला निघाला की सरकार सल्ला देते पुणे कोल्हापूर मार्गे कोकणात जा, अरे आम्ही आमच्या हक्काच्या रस्त्याने जायचे नाही तर किती वर्षे दुसर्‍यांच्या दारातून घरी जायचे हे यापुढे जमणार नाही, आधी आमचा रस्ता पूर्ण करा. जोपर्यंत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण होत नाही तोपर्यंत कोकणासाठी घोषणा होत असलेल्यापैकी एकही नवीन महामार्ग होऊ देणार नाही, असा इशारा कोकण भूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय यादवराव यांनी दिला.

 

 

Loading

Facebook Comments Box






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search