कोल्हापूर: मागील कित्येक वर्षांपासून रेंगाळलेल्या बेळगाव-चंदगड-सावंतवाडी या रेल्वेमार्गाचे काम लवकरात लवकर चालू करण्यात यावे यासाठी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी अलीकडेच कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज यांची भेट घेतली होती. त्यांना शाहू महाराज यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लगोलग त्यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाचे खासदार नारायण राणे यांना मोबाईलद्वारे संपर्क साधून या प्रकल्पासाठी त्यांचे सहकार्य आवश्यक असल्याचे सांगितले. खासदार नारायण राणे यांनीही या प्रकल्पासाठी आपले पूर्ण सहकार्य राहील असे आश्वासन दिले आहे. तसेच आपण संयुक्तपणे रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करू असेही सांगितले. त्यामुळे हा रेल्वे मार्ग लवकरच अस्तित्त्वात येण्याची आशा निर्माण झाली आहे.
११४ किलोमीटर अंतर असलेल्या बेळगाव-चंदगड-सावंतवाडी या रेल्वे मार्गाचा पहिला सर्वे १९७० रोजी झाला होता. त्यानंतर २०१८ रोजी साऊथ वेस्टर्न रेल्वेच्या अधिकार्यांनी या मार्गाचा पुनः सर्वे करून आपला अहवाल रेल्वे मंत्रालयाकडे सुपूर्त केला होता. मात्र त्या नंतर योग्य पाठपुरावा झाला नसल्याने हा रेल्वे मार्ग प्रस्ताव रेंगाळला. अशी माहिती संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश दळवी यांनी दिली. बेळगाव, कुद्रेमनी, माडवळे, हलकर्णी, नागनवाडी, चंदगड, कानूर, आंबोलीमार्गे सावंतवाडी असा हा लोहमार्ग आहे.बेळगाव-सावंतवाडी मार्गाने दक्षिण रेल्वे आणि कोकण रेल्वे जोडली जाणार आहे. बेळगाव भागातील भाजीपाला कोकण-गोव्यात तर कोकणातील मासे दक्षिण कर्नाटकासह पश्चिम महाराष्ट्रात पोहोचण्यास मदत होणार आहे.
या मार्गात बेळगाव, चंदगड, आंबोलीसह एकूण 9 स्टेशन्स निश्चित केली आहेत. या लोहमार्गाचा अपेक्षित खर्च 1805.09 कोटी ऊपये असून निश्चितच तो भारतीय रेल्वेला परवडणारा आहे. या लोहमार्गामुळे होणारा आणखी एक प्रमुख लाभ म्हणजे जेव्हा कधी कोकण रेल्वेच्या मार्गात दरडी कोसळून मार्ग बंद पडतो, त्यावेळी कोकण रेल्वेची वाहतूक बेळगावमार्गे वळविता येणे शक्य होणार आहे. शिवाय सध्याचे बेळगावहून खानापूर, लोंढा, कॅसलरॉक, मडगाव, करमळी, पेडणेमार्गे सावंतवाडी हे अंतर 279 कि.मी. आहे. बेळगाव-सावंतवाडी लोहमार्ग झाल्यास हे अंतर 114.60 कि.मी. होऊन 165 कि.मी. सध्यापेक्षा रेल्वेमार्गाने बेळगावला सावंतवाडी जवळ होणार आहे, असा सकारात्मक अहवाल बेंगळूरचे मुख्य इंजिनिअर राम गोपाल यांनी रेल्वे मंत्रालयास पाठवला आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून विजयी होणाऱ्या खासदाराने बेळगाव आणि सिंधुदुर्गच्या खासदारांच्या मदतीने स्वत: कॅप्टनशीप करून बेळगाव-सावंतवाडी लोहमार्गाचा प्रश्न सोडवला पाहिजे. त्यामुळे चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज तालुक्यातील तसेच कोकणातील चौकुळ आणि आंबोली भागातील लोक रेल्वेच्या कक्षेत येतील. या भागातील प्रवासी पंढरपूर, मुंबईला रेल्वेने जाऊ शकतील. त्यामुळे या भागाच्या विकासाचे नवे पर्व सुरू होईल. स्वातंत्र्यानंतरही रेल्वेच्या प्रतीक्षेत दिवस कंठणाऱ्या वंचित भागाच्या विकासाची परिमाणे बदलू शकतील
खासदार शाहू महाराज यांनी आताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या रेल्वे मार्गासाठी पाठपुरावा करून तो पूर्ण करून घेवू असे आश्वासन दिले होते
Facebook Comments Box