कोकण रेल्वेभरती : नेहमीप्रमाणे कोरेने प्रकल्पग्रस्तांना दिल्या वाटाण्याच्या अक्षता- कोकणभूमी प्रकल्पग्रस्त कृती समिती

   Follow us on        
रत्नागिरी: कोकण रेल्वे कॉर्पोरेशनच्या विविध श्रेणीच्या पदांसाठी अधिसूचना क्र. CO/P-R/01/2024 दिनांक 16/08/2024 रोजी जाहीर झालेली झाली आहे. अधिसूचनेनुसार दिनांक 16/09/2024 पासून ऑनलाईन अर्ज करायचे आहेत व अर्ज करण्याची शेवटची तारीख 06/10/2024 रोजी रात्री 11.59 पर्यंत आहे. परंतु सदरच्या अधिसूचनेचे अवलोकन करता एकिकडे प्रकल्पग्रस्त उमेदवारांना प्रथम प्राधान्य देऊ असे आवाहन केले जाते आणि दुसरीकडे प्रकल्पग्रस्तेतर उमेदवार याना अर्ज करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. याचाच अर्थ कोकण रेल्वे भरती अधिकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे प्रकल्पग्रस्तांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. त्यामुळे कोकण रेल्वेच्या नियुक्ती प्रक्रियेसंबंधी प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे आणि कोकण रेल्वे प्रशासनावरचा अविश्वास दृढ झाला आहे अशी प्रतिक्रिया कृती समितीचे अध्यक्ष श्री. संतोष चव्हाण, कार्याध्यक्ष श्री. विनय मुकादम, सचीव श्री. अमोल सावंत आणि सहसचीव श्री. प्रभाकर हातणकर यांनी व्यक्त केली आहे.
कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी या सन 1989-90 मध्ये कवडीमोल भावाने म्हणजेच रु. 150/- प्रति गुंठा या भावाने विकत घेतल्या गेल्या आहेत. आता त्या जमिनीची सदर किंमत प्रति गुंठा दहा लाख रुपये आहे. त्या वेळेला तेव्हाचे अर्थमंत्री माननीय मधु दंडवते साहेब व रेल्वेमंत्री जॉर्ज फर्नांडिस साहेब यांनी जेव्हा कोकण रेल्वे प्रकल्पास मंजूरी देऊन स्वतंत्र कोकण रेल्वे महामंडळ स्थापन केले तेव्हा ज्या भुमिपुत्रानी कोकण रेल्वे प्रकल्पासाठी जमिनी दिल्या आहेत, त्यांना प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीस विनाअट कोकण रेल्वेमध्ये नोकरीत घेतली जाईल अशी घोषणा केली होती व तसे त्यांचे स्वप्नही होते. परंतु आजतागायत तसे झालेले नाही. सदर पॉलिसी 1996 पर्यंत लागू होती. परंतु त्यानंतर आलेले व्यवस्थापकीय संचालक भानुप्रकाश तायल यांनी सदर पॉलिसी संबंधित भरती अधिकाऱ्यांनी त्यांच्या सहमतीने काढून टाकली. ह्याचाच अर्थ परप्रांतीय अधिकाऱ्यांमुळेच आजतागायत कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होत आहे हे स्पष्ट होत आहे.
कोकण रेल्वेमध्ये नोकरीसाठी फक्त प्रकल्पग्रस्तांचाच विचार करणेसाठी आम्ही अनेक वर्षांपासून वेळोवेळी पत्रव्यवहार, समक्ष भेटीत कोकण रेल्वे च्या मुख्य व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्मिक अधिकारी यांचेशी चर्चाही केली आहे. त्याही पेक्षा दिनांक 27/02/2024 रोजी आम्ही आमच्या मागण्यांसंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करणेसाठी संयुक्त बैठक लावणेबाबत कळविले होते. परंतु ह्यावर कोकण रेल्वेकडून कृती समितीकडे कोणताच पत्रव्यवहार वा चर्चा झालेली नाही. ही बाब दुर्देवाची आहे अशी खंत कृती समितीच्या पदाधिकाऱ्यानी व्यक्त केली आहे.
सदर भरती प्रक्रियेसाठी कोकण रेल्वेचे अधिकृत नियुक्ती मंडळ आहे ते संपूर्णतः भ्रष्टाचाराने माखलेले आहे. तसेच जमीन घोटाळ्यामध्ये, नोकरभरती प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपाने माखलेले आहे. तरी सदर भरती प्रक्रियेसाठी नेमलेले मंडळ बरखास्त करून नवीन नेमण्यात यावे आणि त्यावर कोकण भूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीचा एक सदस्य त्या मंडळावर नेमावा अशी आम्ही पूर्वीपासून मागणी करीत आलो आहोत. त्यानंतरच भरती प्रक्रिया राबवावी. सदर भरती प्रक्रिया ही भ्रष्टाचाराने झालेली आहे आणि ती पूर्वीच्या भरती मंडळाच्या आपल्या अधिकाऱ्यांनी केलेली आहे. याचे सबळ पुरावे माहितीच्या अधिकाराखाली कोकणभूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीकडे आहेत. त्याचप्रमाणे हे पुरावे आपल्या मुख्य कार्यालयातील तत्कालिन मुख्य व्यवस्थापकीय संचालक श्री. संजय गुप्ता साहेब तसेच मुख्य कार्मिक अधिकारी श्री. के. के. ठाकूर यांचेसमोर सादर केले असता त्यांनी मान्यही केले होते. तसेच सदर भरती प्रक्रियेमध्ये शंभर टक्के प्रकल्पग्रस्तांना सामावून घेतले पाहिजे यासंदर्भात कोकणचे जेष्ठ नेते आणि मा. खासदार श्री नारायण राणे साहेब यांनाही कल्पना देण्यात आली आहे. तरी याबाबत त्वरीत कार्यवाही करावी अन्यथा कोकण भूमी प्रकल्पग्रस्त शेतकरी रेल्वे ट्रॅक वरती आंदोलनात उतरेल व त्याच्या परिणामाला जबाबदार म्हणून व्यवस्थापकीय संचालक या नात्याने आपण असाल. तरी असा प्रकार होऊ नये याची आपण पूर्णतः दखल घ्याल अशी आम्हाला अपेक्षा आहे. असे कृती समितीच्या वतीने कोकण रेल्वे व्यवस्थापनाला लवकरच कळविण्यात येत आहे.
कोकण रेल्वे मार्गावरून अनेक रेल्वे गाड्या भारताच्या उत्तरेच्या टोकाकडून दक्षिणेकडे धावत आहेत आणि हजारो किलोमिटरचे अंतर कमी झाल्याने अनेक भारतीयांचा वेळ आणि पैसा वाचतो आहे. हे श्रेय नक्कीच कोकण रेल्वेचे उद्गाते कै. मा. मधु दंडवते साहेब आणि जॉर्ज फर्नांडिस साहेबांना द्यायला हवे. ह्या महान द्वयींचे एक मोठे स्वप्न होते की कोकण रेल्वेसाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमीनीच्या मालकांना कोकण रेल्वेमध्ये नोकरी देण्याचे. काही अंशी कोकण रेल्वेने ते पाळले मात्र आज आमचे तिन्ही जिल्ह्यातील अनेक प्रकल्पग्रस्त कोकण रेल्वेमध्ये आपल्याला नोकरी मिळेल ह्या आशेवर जगत आहेत. ही वाट पहाता पहाता त्यांची वयेही उलटून गेली आहेत.
आजवर अनेक प्रकल्पगग्रस्त शिक्षित, उच्चशिक्षित, तांत्रिक परीक्षा उत्तीर्ण झालेले असतानाही बऱ्याच जणांना काही ना काही क्षुल्लक कारणाने डावलून अन्य आसामींना नोकरीत सामावून घेतले आहे. ह्याबाबाबत आम्ही प्रशासनाकडे वेळोवेळी अनेक बाबी पुराव्यानिशी स्पष्ट केलेल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्याबाबत त्याचप्रमाणे प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्याबाबत, त्याचप्रमाणे प्रकल्पग्रस्तांना ग्रुप ‘डी’ व तत्सम पदांसाठी परीक्षा न घेता प्रकल्पग्रस्त उमेदवाराची शैक्षणिक पात्रता आणि शारिरिक चाचणी यांचेवर आधारित प्रतिक्षा यादी तयार करून त्याप्रमाणे नोकरीत सामावून घेण्याबाबत आम्ही वारंवार अर्ज विनंत्या तसेच मा. मुख्य कार्मिक अधिकारी यांचेशी समक्ष चर्चाही केल्या आहेत.
कोकणातील जनसामान्यांमध्ये तसेच प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबामध्ये कोकण रेल्वे भरती प्रक्रियेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
• ज्या भुमिपुत्रांनी कवडीमोल भावाने कोकण रेल्वेसाठी जमीनी दिल्या त्या भुमिपुत्रांना, गोरगरीब प्रकल्पग्रस्तांना कोकण रेल्वे मध्ये नोकरी का देऊ शकत नाही. फक्त प्रकल्पग्रस्तांसाठीच अधिसूचना काढण्यात येत नाही? प्रकल्पग्रस्तांमध्ये पात्र मुले असताना देखील त्यांना क्षुल्लक कारणांनी डावलले जात आहे. प्रकल्पग्रस्त मुलांची पात्र यादी कोकण रेल्वेला देऊन देखील पदभरती किंवा कंत्राटी भरती यात प्रथम प्राधान्य एक ते दोन टक्के आहे.
• कोकण रेल्वे मध्ये निघालेल्या भरती मध्ये प्रथम प्राधान्य हे प्रकल्पग्रस्त उमेदवारांना देणार असे म्हटले असले तरी प्रत्यक्ष तसे होताना दिसत नाही. ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवली जात नाहीये. त्रयस्थ कंपनीला नोकरभरतीचे कंत्राट देऊन ही प्रक्रिया राबवली जाते. पण प्रत्यकक्षात भरतीमध्ये प्रकल्पग्रस्त दिसत नाहीत.
• याही पुढे जाऊन जे कंत्राटदार कोकण रेल्वेने नियुक्त केले आहेत.ते देखील प्रकल्पग्रस्त मुलांना डावलून पर जिल्हयातील मुले भरत आहेत.
कोकण रेल्वेच्या जमीनी कवडीमोलाने अधिग्रहित करुन आज सुमारे 36 वर्षे झाली तरी आज कोकण रेल्वेच्या प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेतलेले नाही ही शोकांतिका आहे. आम्ही कोकण रेल्वेचे प्रकल्पग्रस्त कोकण रेल्वेमध्ये नोकरीत सामावून न घेतल्याने वैफल्यग्रस्त झालो आहोत. कोकण रेल्वेमुळे आज सुमारे 4500 प्रकल्पग्रस्तेतर कर्मचारी व त्यांची कुटुंबे जगतायत परंतु आमचेवर मात्र अन्याय होतोच अशी आम्हा प्रकल्पग्रस्तांची मानसिकता झाली आहे. त्याचप्रमाणे प्रकल्पग्रस्तांसमोर नोकऱ्यात सामावून न घेतल्यामुळे असूयेपोटी अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. अशी प्रतिक्रिया कोकण रेल्वेच्या अनेक भुमिपुत्रांकडून होत आहे. त्याचप्रमाणे आम्हा प्रकल्पग्रस्तांनी कोकण रेल्वेला जमिनी दिल्या परंतु आज आमची घरे जमीनदोस्त होऊन बेघर झालो आहोत. बेरोजगारीमुळे त्रस्त झालो आहोत. आम्हा प्रकल्पग्रस्तांना काही क्षुल्लक कारणाने डावलल्याने नियुक्तीअभावी वय वाढत चालले आहे. त्यामुळे नोकरी आवेदनासाठी वयाची मर्यादा 45 वर्षे करणेसाठी आम्ही वारंवार कोकण रेल्वेकडे विनंती करीत आलो आहोत. मात्र कोकण रेल्वे  ह्यासाठी रेल्वे बोर्डाची मंजूरी आवश्यक असल्याचे कारण सांगून हेतुपुरस्सर नाकारत आहे. ही बाब अत्यंत खेदजनक आहे. अशाही प्रतिक्रिया को. रे. प्रकल्पगग्रस्तांमधून व्यक्त करण्यात येत आहेत.
एकंदीत कोकण रेल्वे भरती प्रक्रिया अधिकाऱ्यांकडून कोकण रेल्वेच्या भुमिपुत्रांना दुजाभाव देऊन निव्वळ आपल्याच अधिकारातील उमेदवारांना प्राधान्य देण्याच्या दृष्टिने आटोकाट प्रयत्न करण्यात येत आहेत हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्या वतीने कृती समितीमार्फत सदरहू अधिसूचना रद्द करुन ती फक्त प्रकल्पग्रस्तांसाठीच असावी ह्याबाबत कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्या वतीने खालीलप्रमाणे मागण्या करण्यात येणार आहेत :
1. कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांची कोणतीही परीक्षा न घेता ग्रुप डी व ग्रुप सी साठी योग्य असे  प्रशिक्षण (ट्रेनिंग) देऊन  त्यांना कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त म्हणून या पदांवरती नियुक्ती करावी.
2. कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांनी ह्यापूर्वी परीक्षा दिल्या होत्या परंतु अनेक उमेदवारांना कागदपत्रांच्या छाननीमध्ये व इतर किरकोळ कारणाने डावलण्यात आलेले आहे, कागदपत्रे मुदतीत सादर करुनही नोकरीत सामावून घेण्यात आलेले नव्हते व अनेक उमेदवारांच्या फिजिकल, मेडिकल उत्तीर्ण झालेले आहेत परंतु प्रतिक्षायादीत समाविष्ट आहेत अशा उमेदवारांची नियुक्ती त्वरित करावी. तसेच अधिसूचना 5/2018 डी ग्रुपसाठी परीक्षा दिलेल्या उमेदवारांना तीस ते पन्नास सेकंदासाठी अनुत्तीर्ण केलेल्यांना त्वरित घ्यावे. (ह्या संदर्भात कोकण रेल्वे मुख्य कार्यालयात अनेक वेळा चर्चा केलेली आहे).
3. कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांची वयोमर्यादा वय वर्ष 45 एवढी करण्यात यावी. (अनेक प्रकल्पग्रस्त उमेदवारांनी ह्यापूर्वी ग्रुप-डी व ग्रुप-सी परीक्षा उत्तीर्ण झाले होते. परंतु कागदपत्र पूर्ततेमध्ये क्षुल्लक कारणावरून सदरहू उमेदवारांना डावलण्यात आले होते. गेल्या पाच वर्षात अशा पदांची भरती न झाल्याने ह्या उमेदवारांची निर्धारित वयोमर्यादा ओलांडण्याची शक्यता आहे. ह्याचा विचार करुन फक्त प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेचा निकष ठेवून तो 45 वर्षे ठेवावा).
4. प्रकल्पग्रस्तांच्या कागदपत्रांच्या छाननी करताना 12/2 च्या नोटीसीमागे एक उमेदवार अशी नियुक्ती करण्यात यावी.
5. यापूर्वी कोकण रेल्वे विरुध्द कोर्टामध्ये अनेक उमेदवारांनी केसेस दाखल केल्या होत्या आणि त्या केस निकाली लागून त्यांना भरती करण्याचे आदेश कोर्टाकडून देण्यात आलेले आहेत. परंतु त्या उमेदवारांना अद्याप कोकण रेल्वेमध्ये सामावून घेतलेले नाही व बरीच वर्षे केसेस चालू राहिल्यामुळे तसेच अधिसूचना न आल्यामुळे त्यांचे वय वाढले आहे. अशा उमेदवारांना नियुक्ती देण्यासंदर्भात समितीसमवेत आपली चर्चा व्हावी ही विनंती.
दिनांक 9 मे 2018 रोजी झालेल्या बैठकीत आणि डिसेंबर 2018 मधील कोकण रेल्वे च्या अधिकाऱ्यांच्या संपन्न झालेल1या बैठकीत क्षुल्लक कारणावरून डावलेल्या कृती समीतीच्या नोंदीत उमेदवारांचा आम्ही पुनश्च विचार करू आणि पुढील भरतीत सामावून घेऊ असे तत्कालिन सीएमडी मा. गुप्ता साहेब आणि मुख्य कार्मिक अधिकारी श्री. के. के. ठाकूर साहेब यांनी आश्वासन दिले होते. सदर प्रकरणावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. सदरबाबत आम्ही लेखी पुरावेही सादर केलेले होते व त्यास त्यांनी मान्यताही दिली होती.  अशा उमेदवारांची व प्रतिक्षायादीत असलेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण घेऊन नेमणुक होणेबाबत कृती समितीची आग्रहाची मागणी आहे.
ह्याबाबत रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कोकणातील जनतेची व्यथा जाणून घेणारे एकमेव जेष्ठ नेते आणि खासदार मा. ना. नारायण राणे साहेब यांना ह्यामध्ये योग्य तो मार्ग काढून प्रकगल्पग्रस्तांना वरील मागण्या मान्य करणेसाठी मे. कोकण रेल्वे व्यवस्थापनाकडे चर्चा करणेसाठी आग्रहाची विनंती करण्यात येणार आहे. याबाबत कृती समितीचे पदाधिकारी गोरगरीब कोकण रेल्वेचे भुमिपुत्र ह्यावेळी आवर्जुन उपस्थित राहून आपल्या व्यथा कथन करणार असल्याचे कृती समितीचे कार्याध्यक्ष श्री. विनय मुकादम यांनी सांगितले आहे.
त्याचप्रमाणे कोकण रेल्वे प्रकल्प्रस्तांच्या व्यथां मांडताना कृती समितीचे वतीने, सन 2027 पर्यंत सुमारे 2500 पदे रिक्त होणार असल्यामुळे कोकण रेल्वे आधी भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण न करता ही पदे प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातूनच भरावीत जेणेकरुन ही भरती म्हणजे कोकण रेल्वेचे स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण करणाऱ्या कै. मा. मधु दंडवते व मा. जॉर्ज फर्नांडिस साहेब यांना आदरांजली ठरेल असे वक्तव्य कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त आणि कृती समितीच्या वतीने करण्यात येत आहे

Loading

Facebook Comments Box






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search