मालवण, दि. २६ ऑगस्ट : ज्या महाराजांचा त्यांनी केलेल्या मजबूत किल्ल्यांच्या बांधकामांची उदाहरणे देवून गौरव केला जातो त्यांचाच पुतळा अवघ्या काही महिन्यांत कोसळण्याची अपमानास्पद आणि चीड आणणारी घटना आज सकाळी मालवणात घडली आहे. मालवण राजकोट किनारी उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना आज, सोमवारी दुपारी घडली. छत्रपतींचा पुतळा कोसळल्यामुळे येथील शिवप्रेमी संतप्त झाले असून निकृष्ट बांधकामामुळे हा पुतळा पडला असल्याचा आरोप केला आहे.
अवघ्या ९ महिन्यांत पुतळा कोसळला
४ डिसेंबर २०२३ रोजी नौदल दिनाच्या निमित्ताने मोठा गाजावाजा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. राजकोट येथे शिवपुतळा परिसराच्या सुशोभिकरणासाठी आणि इतर व्यवस्थेसाठी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली यांच्या कार्यालयाकडून सुमारे पाच कोटी रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली होती. राज्य शासन आणि नौदल विभागाने निश्चित केल्या नंतरच राजकोट येथील जागेवर पुतळा उभारणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुमारे ४३ फूट उंच होता. जमिनी पासून बांधकाम १५ फूट तर त्यावर २८ फूट उंच हा पुतळा उभारण्यात आला होता.
शिवप्रेमी संतप्त
ज्या महाराजांचा त्यांनी केलेल्या मजबूत किल्ल्यांच्या बांधकामांची उदाहरणे देवून गौरव केला जातो त्यांचाच पुतळा अवघ्या काही महिन्यांत कोसळण्याची घटना अपमानास्पद आणि आणि चीड आणणारी असल्याची भावना शिवप्रेमींनी व्यक्त केली आहे. हे बांधकाम बेजबाबदारपणे करण्यात आले असून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad