दुर्लक्षित स्थानकांना न्याय देण्याची संधी कोकण रेल्वेने वाया घालवली

   Follow us on        

Konkan Railway :वांद्रे मडगाव एक्सप्रेस ही नवीन गाडी कोकण रेल्वे मार्गावर पुढच्या आठवड्यापासून धावणार आहे. पाश्चिम रेल्वे मार्गावरून खास कोकणी जनतेसाठी सोडण्यात आलेल्या या गाडीचे कोकणकरांनी स्वागत केले असले तरी या गाडीच्या विचित्र वेळापत्रकामुळे तसेच अनेक प्रमुख स्थानकांना थांब्यांच्या यादीतून वगळण्याने काही प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अनेक वर्षांनी कोकण रेल्वेला दुर्लक्षित स्थानकांना न्याय देण्याची संधी उपलब्ध झाली होती. पण ती वाया गेलेली पाहताना अतीव दुःख होत आहे. या गाडीला प्रत्येक तालुक्यात किमान १ ते २ थांबे देण्यात यावेत यासाठी रेल्वे अभ्यासक श्री. अक्षय महापदी यांनी रेल्वे प्रशासनाला ईमेल द्वारे एक निवेदन दिले आहे.

निवेदन:

बोरिवली – वसई – सावंतवाडी नियमित गाडी सुरु व्हावी यासाठी महाराष्ट्रातील अनेक प्रवासी संघटनांनी गेली १० ते १५ वर्षे सतत प्रयत्न केले. एक प्रकारचा लढा उभारून हा निवडणुकीचा मुद्दा केला. त्यामुळेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी केंद्रीय मंत्र्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे लवकरच १०११५/१०११६ मडगाव वांद्रे मडगाव द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस सुरु होत आहे.

आजच रेल्वे बोर्डाचे पत्र सर्वांना मिळाले आहे. त्यात नमूद केल्यानुसार ही गाडी केवळ बोरिवली, वसई, भिवंडी, पनवेल, रोहा, वीर, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, थीवी आणि करमळीला थांबणार आहे. ही मोठी निराशा असून बहुतांश कोकणवासीयांचा हिरमोड झाला आहे.

पेण, माणगाव, खेड, संगमेश्वर, लांजा (विलवडे), राजापूर, वैभववाडी अशा ७ तालुक्यांत तर कुडाळसारख्या महत्वाच्या स्थानकावर तसेच नागोठणे, सापे-वामने, करंजाडी, सावर्डा, आरवली रोड, आडवली, झाराप, मडुरे यांसारख्या इतर स्थानकांतही वाढीव गाड्यांची आवश्यकता असताना थांबे दिलेले नाहीत.

१०११५/१०११६ वांद्रे मडगाव एक्सप्रेसचा सरासरी वेग ताशी ३८ ते ४० किमीच्या दरम्यान आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे १०१०५/१०१०६ दिवा सावंतवाडी एक्सप्रेस आणि ५०१०३/५०१०४ रत्नागिरी दिवा पॅसेंजरचा वेगही तेवढाच आहे. परंतु दिवा सावंतवाडीला पनवेल व सावंतवाडी दरम्यान ३०, दिवा रत्नागिरीला पनवेल व रत्नागिरी दरम्यान २६ थांबे आहेत तर नव्याने सुरु होत असणाऱ्या गाडीला केवळ ७ थांबे आहेत. एवढ्या संथ गाडीला अपेक्षेप्रमाणे थांबे न दिल्यामुळे बहुतांश महाराष्ट्राला या गाडीचा फायदा होणार नाही. कोणतीही मागणी न करता गोव्याला थिवी आणि करमळी या केवळ १५ किलोमीटरवर असणाऱ्या दोन्ही स्थानकांवर थांबणारी गाडी दिली. परंतु, तीच गाडी महाराष्ट्रात पनवेल-रोहा ७५ किमी, वीर-चिपळूण ९८ किमी, चिपळूण-रत्नागिरी ७५ किमी, रत्नागिरी ते कणकवली १११ किमी अशा मोठ्या अंतरावर कुठेही थांबणार नाही. अनेक वर्षांनी कोकण रेल्वेला दुर्लक्षित स्थानकांना न्याय देण्याची संधी उपलब्ध झाली होती. पण ती वाया गेलेली पाहताना अतीव दुःख होत आहे.

अनेक वर्षांच्या संघर्षानंतर पश्चिम रेल्वेवरून नियमित गाडी सुरु होत असल्यामुळे त्या गाडीला मध्य रेल्वेमार्गावरून कोकण रेल्वेवर सुरु झालेली पहिली गाडी दिवा सावंतवाडी प्रमाणे जास्तीत जास्त थांबे मिळणे आवश्यक आहे. तरी, १०११५/१०११६ मडगाव वांद्रे एक्सप्रेस या गाडीला अंधेरी, पेण, नागोठणे, माणगाव, सापे-वामने, करंजाडी, दिवाणखवटी, खेड, अंजनी, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, आडवली, वेरवली, विलवडे, सौंदळ, राजापूर रोड, खारेपाटण रोड, वैभववाडी रोड, कुडाळ, झाराप आणि मडूरे येथे वाढीव थांबे देण्यात यावेत ही विनंती. प्रत्येक तालुक्यात किमान एक किंवा दोन थांबे मिळाल्याशिवाय या गाडीचा म्हणावा तसा उपयोग होणार नाही व गाडी लोकप्रिय होणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

एकदा गाडी सुरु झाल्यानंतर नव्याने थांबे मिळवणे किचकट प्रक्रिया आहे. त्यामुळे गाडी सुरु होण्याआधीच रेल्वे बोर्डला सुधारित प्रस्ताव पाठवून वाढीव थांबे मंजूर करण्यात यावेत, ही विनंती.

Loading

Facebook Comments Box






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search