मुंबई: वांद्रे टर्मिनस – मडगाव द्वि-साप्ताहिक एक्सप्रेसला केंद्रीय रेल्वे वाहतूक मंत्री आश्विनी वैष्णव यांनी हिरवा बावटा दाखवून मार्गस्थ केले. बोरिवली स्थानकावर या एक्सप्रेसच्या शुभारंभाचा कार्यक्रम दुपारी साडे तीन वाजता पार पडला.
पश्चिम रेल्वे मार्गावरुन धावणाऱ्या या ट्रेनमुळे कोकणात जाणाऱ्यांसाठी नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.केंद्रीय मंत्री आश्विनी वैष्णव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एक्सप्रेसला हिरवा बावटा दाखवला. यावेळी बोरिवली रेल्वे स्थानकावर भाजप नेते पियुष गोएल, प्रविण दरेकर यांच्यासह रेल्वे अधिकारी व राजकीय नेते उपस्थित होते.
बोरिवली – मडगाव ट्रेन क्रमांक ०९१६७ ला बावटा दाखवल्यानंतर ट्रेनने मडगावच्या दिशेने प्रस्थान केले.
वांद्रे टर्मिनस – मडगाव द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस कोकणात आर्थिक विकास वाढवेल तसेच, या ट्रेनचा स्थानिक व्यापार आणि व्यवसायांना फायदा होणार आहे. तसेच, सिंधू एक्स्प्रेसद्वारे प्रवास सुलभ झाल्याने या प्रदेशाच्या सामाजिक-आर्थिक विकासाला चालना मिळेल.वांद्रे टर्मिनस ते मडगाव दर बुधवार आणि शुक्रवार तर, मडगाव ते वांद्रे टर्मिनस दर मंगळवार आणि गुरुवार ही ट्रेन धावणार आहे. प्रवाशांना IRCTC च्या संकेतस्थळावरुन यासाठी बुकींग करता येणार आहे.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असते. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने पश्चिम मार्गावर वांद्रे – मडगाव एक्सप्रेस सुरु करण्याचा निर्णय घेतला.
गणेशोत्सवादरम्यान प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना या ट्रेनमुळे प्रवासाचा आणखी एक सोयीस्कर आणि आरामदायी पर्याय उपलब्ध झाला आहे.
Vision Abroad