



मुंबई: यावर्षी गणेशोत्सवाच्या तोंडावर महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ अर्थात एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिल्याने कोकणात गावी जाणार्या चाकरमान्यांची कोंडी होण्याची शक्यता आहे.
काय आहेत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या?
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे, प्रलंबित महागाई भत्ता आणि फरक, वाढीव घरभाडे भत्ता आणि फरक, वेतनवाढीच्या दराचा फरक तसेच 4849 कोटी रुपयांमधील शिल्लक रकमेचे वाटप आणि नुकत्याच मुळ वेतनात जाहीर केलेल्या पाच हजार, चार हजार आणि अडीच हजार रुपयांऐवजी सरसकट 5000 रुपये हजार मिळावेत अशा मागण्या एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आल्या आहेत.
गणपतीच्या काळात कोकणात जाण्यासाठी प्रवाशांची प्रचंड गर्दी होते. त्यामुळे या काळात कोकणात विशेष एसटी बसेस सोडल्या जातात. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे त्यावर परिणाम होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन एसटी प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच कर्मचाऱ्यांना आंदोलनामध्ये भाग न घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे आता किती एसटी कर्मचारी आणि कोणत्या संघटना या आंदोलनात सहभागी होणार? हे पाहावे लागेल.
याशिवाय, एसटी स्थानकांवर आवश्यक तो पोलिस बंदोबस्त लावण्यात यावा, यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. आंदोलनावेळी बसस्थानकात कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये, यादृष्टीने दक्षता घेतली जात आहे. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे कुठल्याही डेपोत एसटी बसच्या फेऱ्या रद्द झाल्यास त्याच्या सूचना मध्यवर्ती कार्यालयात दिल्या जातील. जेणेकरून एसटी प्रशासनाकडून प्रवाशांसाठी पर्याची बसेसची सोय केली जाईल.