Vande Bharat Express: भारतीय रेल्वेकडे तयार असलेल्या 16 वंदे भारत ट्रेन धूळ खात यार्डात उभ्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वंदे भारत सेवा सुरु करण्यासाठी तांत्रिक तसेच आर्थिक दृष्ट्या परवडेल अशा मार्गांची चाचपणी सुरु असून सध्या तरी असे मार्ग सापडले नसल्याने या वंदे भारत ट्रेन यार्डातच हिरव्या झेंड्याच्या प्रतिक्षेत धूळ खास उभ्या असल्याचं समजतं.
ट्रेन सुरु करण्यात अडचण काय?
रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय रेल्वे सध्या अशा मार्गांच्या शोधात आहे तिथे या वंदे भारत ट्रेन ताशी 130 ते 160 किलोमीटर वेगाने चालवता येतील. तसेच वंदे भारत ट्रेनसाठी आधुनिक सिग्नल यंत्रणेचीही गरज असल्याने या ट्रेन धूळ खात पडल्याची माहिती ‘मातृभूमी’ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. परवडतील अशा मार्गांवर सर्वात प्रिमिअम ट्रेन्सपैकी असलेल्या वंदे भारत चालवण्याचा रेल्वेचा मानस असून आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या मार्गांची चाचपणी सुरु आहे. इतर ट्रेनच्या वेळापत्रकामध्ये अडथळा निर्माण न करता चालवता येतील अशापद्धतीने या ट्रेनचा समावेश वेळापत्रकात करुन घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र असा टाइम स्लॉट अद्याप सापडलेला नाही. तसेच अनेक ट्रॅक हे हायस्पीड ट्रेनच्या वाहतुकीसाठी अद्यावत करण्यात आलेले नाही. त्यामुळेच कमी अंतरावरील अनेक मार्गांवर आवश्यकता असूनही या वंदे भारत ट्रेन सुरु करता येत नसल्याचे समजते.
सामान्यपणे 8 डब्ब्यांची एक वंदे भारत ट्रेन चालवण्यासाठी चार ते पाच ट्रेनच्या वेळापत्रकामध्ये बदल करावा लागतो. त्यामुळे एका ट्रेनचा परिमाण किमान 5 हजार प्रवाशांवर होतो. दुसरीकडे वंदे भारतमधून 500 प्रवासी प्रवास करतात. म्हणूनच वंदे भारतला स्लॉट देण्यासाठी केल्या जाणाऱ्या तडजोडीमुळे इतर प्रवाशांची नाराजी ओढावून घ्यावी लागते, असं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. यामुळे जनतेत वंदे भारत सेवेबद्दल चुकीचा संदेश जाता कामा नये असा रेल्वेचा प्रयत्न आहे.
वंदे भारतसाठीच्या अटी
वंदे भारत चेअर कार ट्रेन एका वेळेस एका मार्गावर जास्तीत जास्त 8 तासांचा प्रवास करते. त्यामुळेच मागणी असलेल्या आणि 8 तासांमध्ये प्रवास पूर्ण होईल अशा मार्गांचा शोध सध्या सुरु आहे. तसेच वंदे भारत ट्रेन मध्य रात्री 12 पासून पहाटे 5 पर्यंत चालवल्या जात नाहीत.
Vision Abroad