सिंधुदुर्ग: सिंधुरत्न समृद्ध योजनेंतर्गत भात पिकासाठी प्लास्टिक ताडपत्री खरेदी योजनेसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी २७ सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी केले आहे.
जिल्ह्यात साधारणत: ३५०० मि.मी. पाऊस पडतो. या पावसामुळे काढणीच्या वेळेस साधारणत: १५ ते २० टक्के नुकसान होते. भात पिकाचे काढणीच्या वेळेत होणारे नुकसान टाळण्यासाठी सिंधुरत्न समृद्ध योजना २०२४-२५ अंतर्गत प्लास्टिक ताडपत्री खरेदी योजनेकरिता ७५ टक्के अनुदान तत्त्वावर मंजुरी दिली आहे. या योजनेस पात्र शेतकऱ्याकडे ०.१० हेक्टर क्षेत्र भात पिकाखालील असावे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती, महिला तसेच अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल. जिल्हा परिषद कृषी विभाग यांची जिल्हास्तरीय खरेदी समितीने निश्चित केलेला दर २ हजार प्रति प्लास्टिक ताडपत्री आहे. त्यानुसार ७५ टक्के अनुदानाप्रमाणे प्लास्टिक ताडपत्रीसाठी जास्तीत जास्त १ हजार ५०० रुपये प्रति ताडपत्री अनुदान देय राहील. एका शेतकऱ्यास जास्तीत जास्त एक ताडपत्री खरेदी करता येईल. सिंधुरत्न समृद्ध योजनेंतर्गत आंबा पिकासाठी प्लास्टिक क्रेट्स आणि प्लास्टिक ताडपत्री योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यास या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील दिलेल्या नमुन्यात अर्ज भरून तो तालुका कृषी कार्यालय अथवा संबंधित क्षेत्रीय कृषी सहायक यांच्याकडे जमा करणे आवश्यक आहे. योजनेसाठी सातबारा, ८ अ उतारा , बँक पासबुक, आधार कार्ड व रेशन कार्ड आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.

Facebook Comments Box