



मुंबई:- रायझिंग सन क्रीडा उत्सव मंडळ (रजि.) चारकोप सेक्टर एक यांच्या वतीने आयोजित केलेल्या वार्षिक उत्सवात क्रिकेट, होम मिनिस्टर, वेश भूषा, चित्रकला, पाक कला स्पर्धा, कोजागिरी, रास गरबा – दांडिया तसेच श्री सत्यनारायणाची महापूजा इ. कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम आर.एस.सी. १५ मधील बाळ-गोपाळ, बंधू – भगिनी व रहिवाश्यांनी जल्लोषात व उत्साहात साजरा केला. उत्सवा दरम्यान रस्ता क्रमांक १५ विद्युत रोषणाईने झगमगला होता.
क्रिकेट स्पर्धेच्या अटीतटीच्या लढतीत साईकुंज संस्थेनेच्या महिला व पुरुष या दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळ करत विजेते पद पटकविले. या स्पर्धेचे अप्रतिम नियोजन केतन धाटावकर व गिरीश दहीबावकर यांनी केले होते.
महिलांचा आवडता कार्यक्रम “होम मिनिस्टर” म्हणजेच खेळ पैठणीचा पाऊस असूनही खूपच रंगतदार ठरला. आपल्या खास शैलीत निवेदक प्रशांत प्रिंदावनकर आणि सुधाकर वस्त यांनी एकामागून एक रंगतदार खेळांचे सादरीकरण करून खेळाडूंसोबतच प्रेक्षकांनादेखील या खेळांची भुरळ पाडली. या स्पर्धेच्या विजेत्या रंगावली संस्थेतील श्वेता सतिश कदम यांना पैठणी भेट देण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आपला माणूस भूषण अनंत विचारे यांनी पैठणी, सोन्याची नथ, स्मार्ट घड्याळे आणि एअर पौडस्, तसेच सहभगी भगिनिंस पारितोषिके देवून मंडळास मोलाचे सहकार्य केले.
सत्यनारायण पूजा दिनी बाळ गोपलांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, त्यात १३६ स्पर्धकांनी भाग घेऊन स्पर्धेत चुरस निर्माण केली. तसेच महिलांसाठी आयोजलेल्या पाककला स्पर्धेत देखील अनेक भगिनींनी भाग घेवून एकापेक्षा एक सरस पदार्थांची मेजवानी सादर केली. साई कुंज संस्थेतील सुजाता नाईक यांच्या ‘कडबू’ या पारंपरिक पदार्थाने बाजी मारून प्रथम क्रमांक पटकावला. डी.जे.जग्गु यांच्या तालावर रास – गरब्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यात विविध वेशभूषा करून अबाल वृद्धांनी सहभाग घेवून आनंद व्यक्त केला.
उत्सव मंडळाच्या वतीने विभागात कला, क्रीडा, सांस्कृतिक, वैद्यकीय व शैक्षणिक उपक्रम राबविण्याचा मंडळाचा मानस आहे असे राजेश सोरप अध्यक्ष व अमित पालांडे, चिटणीस यांनी सांगितले.
कार्यक्रमांची सांगता भूषण विचारे, निखिल गुढेकर, राजन निकम , दिनेश साळवी, सुधाकर कदम या व इतर मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे वितरण करून करण्यात आली.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष राजेश सोरप, उपाध्यक्ष सुधाकर वस्त, चिटणीस अमित पालांडे, उपचिटणीस राहूल केदारी, खजिनदार सुनीत कदम, उपखजिनदार निलेश धावडे तसेच प्रशांत प्रिदांवनकर, हरीश सूर्यवंशी, राजेश सोनवणे प्रवीण सावंत, कुणाल विश्वकर्मा, विशाल पांड्या, राजू परब, चेतन चौलकर, डॉक्टर मकरंद गावडे, कमलाकर सक्रे या व इतर अनेक कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रशांत प्रिदांवनकर यांनी केले. तसेच सर्व रहिवाशी, मान्यवर, हितचिंतक, देणगीदार यांच्ये आभार सुधाकर वस्त यांनी व्यक्त केले.