Konkan Railway: पश्चिम रेल्वे मार्गावरून कोकणात जाण्यासाठी एक गाडी सोडण्यात यावी या कोकणकरांच्या मागणीची दखल घेऊन या मार्गावर एक गाडी सुरु करण्यात आली. बांद्रा – मडगाव -बांद्रा द्विसाप्ताहिक एक्सप्रेस ही पश्चिम रेल्वे मार्गावरून कोकणासाठी धावणारी ही एकमेव गाडी असल्याने तिला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद लाभणे अपेक्षित होते. दिनांक २९ ऑगस्टपासून सुरू झालेल्या या ट्रेनमधून सुरुवातीला क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत होते; परंतु आता मात्र प्रवासीसंख्या घटली आहे. गणेशोत्सवात या ट्रेनमधून तिच्या क्षमतेपेक्षा १० ते १५ टक्के अधिक प्रवासी प्रवास करत होते; मात्र आता प्रवासी संख्या कमी झाली आहे. आता प्रवासी संख्या ७० ते ७८ टक्के एवढ्यावर आल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबईहून निघताना ही गाडी बांद्रा या स्थानकावरून सकाळी ६:५० वाजता निघते ती तब्बल १२ तास १० मिनटे इतका अवधी घेऊन संध्याकाळी ७ वाजता सावंतवाडी टर्मिनस येथे पोहोचते. तर जवळपास एवढ्याच अंतराच्या प्रवासासाठी सकाळी ७:१० वाजता मुंबई सीएसएमटी वरून सुटणाऱ्या मांडवी एक्सप्रेसचा सावंतवाडी टर्मिनस येथील वेळ संध्याकाळी ४ वाजून २८ मिनिटे असा आहे. म्हणजे या प्रवासाला मांडवी एक्सप्रेस ९ तास १८ मिनिटे इतका अवधी घेते.
या गाडीला काही मोजकेच थांबे देण्यात आले आहेत. वसईमधून या गाडीला मध्य रेल्वेच्या ट्रॅकवर वळवावे लागत असल्याने अधिकची लागणारी ३० ते ४५ मिनिटे सोडली तरी ही गाडी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत तरी सावंतवाडी स्थानकावर पोहोचणे अपेक्षित आहे. तळकोकणात ही गाडी उशिरा पोचत असल्याने पुढील प्रवासासाठी मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याने येथील प्रवासी या गाडीला पसंदी देताना दिसत नाहीत.
ती आशाही ठरली फोल
यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यात सुरु झालेल्या या गाडीला एखाद्या पॅसेंजर गाडीचे वेळापत्रक दिल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र सध्या कोकण रेल्वेचे ‘मान्सून वेळापत्रक’ चालू असल्याने या गाडीला असे वेळापत्रक देण्यात आले असून ‘बिगर मान्सून’ वेळापत्रकात बदल करण्यात येऊन या गाडीचा प्रवास अवधी कमी करण्यात येईल असे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. मात्र कोकण रेल्वेने दिनांक ०१ नोव्हेंबर पासून अंगिकारलेल्या ‘बिगर मान्सून’ वेळापत्रकात या गाडीच्या वेळेत काहीही बदल करण्यात आला नाही. त्यामुळे प्रवाशांचा हिरमोड झाला आहे.
Facebook Comments Box