Konkan Railway : कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना सध्या सोसाव्या लागत असलेल्या अनेक गैरसोयीवर उपाय असलेल्या कोकण रेल्वे विलिनीकरणच्या प्रश्नाला आता खासदार संसदेत मांडत असल्याचे सकारात्मक चित्र दिसून येत आहे. कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्याबाबत खासदार धैर्यशील पाटील यांनी राज्यसभेत प्रश्न उपस्थित केला आहे. त्यावर चार राज्यांच्या हक्क सोडण्यावर कोकण रेल्वेचे विलीनीकरण अवलंबून असल्याने ते काहीसे किचकट आहे, असे उत्तर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले आहे.
कंपनी अॅक्टनुसार कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीची नोंदणी झाली आहे. यात भांडवली खर्चासाठी भारतीय रेल्वे, महाराष्ट्र सरकार, कर्नाटक सरकार, केरळ आणि गोवा सरकार यांनी गुंतवणूक केली आहे. 25 वर्षांपासून कोकण रेल्वेसाठी रेल्वे मंत्रालय भागीदार असून कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचा खर्च चार राज्ये करत आहेत. त्यामुळे कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करणे हे चार राज्यांच्या हक्क सोडण्याच्या अटीवरच अवलंबून आहे. त्यामुळे हा प्रश्न केवळ केंद्र सरकारचा नसून चार राज्यांच्या अखत्यारितील ही आहे.
दरम्यान, कोकण रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण, रोहा ते वीर सेक्शनचे दुपदरीकरण, अतिरिक्त थांबे यावर भर देतानाच प्रवाशांना सोयीसुविधा देण्यावरही भर दिला जाईल, असे उत्तर रेल्वेमंत्री वैष्णव यांनी दिले आहे. तसेच कोकण रेल्वे मार्गावर सात नवीन ट्रेन सुरू केल्या जातील त्यात दोन वंदे भारत ट्रेन दिल्या आहेत. प्रवासी तसेच स्थानिकांच्या सोयीसाठी ओव्हरब्रिज, सबवे, पाथवे, नवीन प्लॅटफॉर्म, प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण या सुविधादेखील उपलब्ध करण्याचे लेखी आश्वासन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव उत्तरातून दिले आहे.
कोकण रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत विलीन करावी अशी मागणी राज्यसभेत केल्याबद्दल रेल्वे प्रवासी संघटनांनी आमदार धैर्यशील पाटील यांचे आभार मानले आहेत.
” अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची मागणी आणि कोकणातील रेल्वे मार्गाच्या विकासाकरिता महत्वाचा असलेला हा मुद्दा संपूर्ण देशासमोर मांडण्यासाठी संसदीय आयुधाचा वापर केल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. ज्याप्रमाणे कोकण रेल्वेच्या उभारणीसाठी स्वर्गीय मधू दंडवते आणि जॉर्ज फर्नांडिस यांचे स्मरण आजही केले जाते त्याचप्रमाणे कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण ही देखील ऐतिहासिक घटना असेल. त्यासाठी संसदेत पाठपुरावा केल्याबद्दल आपलेही नाव इतिहासात नोंदवले जाईल यात शंका नाही. लवकरच आपली भेट घेऊन आम्ही आमची भूमिका आणखी विस्तृतपणे मांडू. तूर्तास आपले खूप खूप आभार.” या शब्दात पत्र आणि ईमेल पाठवून अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती, महाराष्ट्र ने यासाठी त्यांचे आभार व्यक्त केले असल्याची माहिती संघटनेचे सचिव अक्षय महापदी यांनी दिली आहे.
Vision Abroad