मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्य सरकारने मुंबईच्या वेशीवरील पाचही पथकर नाक्यांवर हलक्या वाहनांसाठी टोलवसुली बंद केल्याचा निर्णय ताजा असतानाच मोठा गाजावाजा करुन उभारण्यात आलेल्या शिवडी-न्हावाशेवा ‘अटल सेतू’वरील वाहनांची संख्या लक्षणीय प्रमाणात रोडावल्याने टोलमुक्तीचा फटका ‘अटल सेतू’ला बसल्याची चर्चा आता जोर धरु लागली आहे. ॲाक्टोबर महिन्यात अटल सेतूवरुन सात लाख सात हजार १०४ वाहनांनी प्रवास केल्याची नोंद झाली. ही संख्या नोव्हेंबर महिन्यात सहा लाख ६९ हजार ९२ पर्यत खाली घसरली असून पथकर नाक्यांवरील टोलमाफी हे कारण यामागे असू शकते का, यावर आता चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे, या काळात अटल सेतूवरुन हलक्या वाहनांची संख्या सर्वाधिक घटली आहे.
मुंबई – नवी मुंबई प्रवास अतिवेगवान व्हावा यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) शिवडी – न्हावाशेवा असा २१.८ किमी लांबीचा सागरी सेतू बांधला आहे. लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता तोंडावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जानेवारी महिन्यात हा सेतू वाहतूक सेवेत दाखल झाला. मुंबई ते नवी मुंबई हे अंतर जेमतेम १२ ते १५ मिनिटांत कापणे यामुळे शक्य झाले. नवी मुंबईच्या दक्षिणेकडील उलवे, उरण, द्रोणागिरी, जासई, पनवेल, गव्हाण यासारख्या उपनगरांमधील रहिवाशांसाठी मुंबई या सेतूमुळे जवळ आल्याने येथील प्रवासी नागरिकांचा मोठा प्रतिसाद अटल सेतूला मिळेल असे दावेही केले जात होते. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हा सेतू सुरु करताना एका बाजूस प्रवासासाठी २५० रुपयांचा टोल आकारण्याचा निर्णय जाहीर केला आणि नियमित कामानिमित्त मुंबईत येजा करणाऱ्या प्रवाशांचा भ्रमनिरास झाल्याचे पहायला मिळाले. तशा प्रतिक्रियाही या उपनगरांमध्ये उमटल्या. असे असले तरी पुणे तसेच मुंबई-गोवा महामार्गावरुन मुंबईच्या दिशेने येजा करणाऱ्या प्रवाशांसाठी अटल सेतू सोयीचा ठरल्याचे चित्र आहे. असे असले तरी अजूनही नजिकच्या महिन्यांमध्ये या सेतूवरुन प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या दहा लाखांच्या पलिकडे पोहोचलेली नाही. राज्य सरकारने मुंबईच्या वेशीवरील पथकर नाक्यावरील टोल वसुली बंद करण्याचा निर्णय घेताच अटल सेतूवरील प्रवाशी वाहनांची संख्या आणखी कमी झाली असून यामध्ये हलक्या वाहनांची संख्या अधिक असल्याचे पहायला मिळत आहे.
Vision Abroad