सिंधुदुर्ग: २६ जानेवारी २०२५ प्रजासत्ताक दिनी नियोजित सावंतवाडी रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी चे मुंबई प्रतिनिधींनी आज सिंधुदुर्गचे नवनियुक्त पालकमंत्री ना. श्री नितेश राणे यांची भेट घेतली. सावंतवाडी टर्मिनस च्या उर्वरित कामासाठी निधीची तरतूद करावी, सावंतवाडीत रेल्वेचे परिपूर्ण टर्मिनस उभारण्यासाठी आपण राज्यशासनामार्फत निधी उपलब्ध करावा, या ठिकाणी कोरोना काळात काढून घेण्यात आलेल्या गाडी क्र. १२४३१/३२ राजधानी एक्सप्रेस आणि १२२०१/०२ गरीब रथ एक्स्प्रेस चा थांबा पूर्ववत करावा. नव्याने १२१३३/३४ मंगलोर सुपरफास्ट एक्स्प्रेस ला सावंतवाडी थांबा मिळावा, आणि कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करावे या विषयावर पालकमंत्री श्री नितेश राणे यांचे लक्ष वेधण्यात आले. यावर आपण योग्य कार्यवाही करून येत्या काही महिन्यात ही कामे मार्गी लावू असे आश्वासन संघटनेच्या पदाधिकाऱ्याना दिले. यावेळी पालकमंत्री राणे यांचा संघटनेतर्फे शाल आणि भगवी टोपी घालून सत्कार करण्यात आला.
त्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण पूर्व च्या आमदार श्रीमती सुलभा गायकवाड यांची भेट घेऊन त्यांना सावंतवाडी टर्मिनस आणि कोकण रेल्वेचे विलीनीकरण या संदर्भात निवेदन देण्यात आले. आणि सावंतवाडी टर्मिनस का गरजेचे आहे हे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पटवून दिले. त्यावर आमदार श्रीमती गायकवाड मॅडम यांनी या संदर्भात आपण राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र जी फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचा कानावर हा विषय घालते असे संघटनेला आश्र्वासित केले.
यावेळी संघटनेचे मुंबई अध्यक्ष विनोद नाईक, प्रकाश येडगे, प्रशांत परब आदी संघटनेचे मुंबई विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते.
Vision Abroad