रत्नागिरी:महर्षी हर्षी सांदिपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठान उज्जैन आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक यांचे भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीच्या इतिहासात पहिल्यांदाच क्षेत्रीय वैदिक संमेलनाचे आयोजन दिनांक ७,८,९ फेब्रुवारी रोजी केले जाणार आहे.
महाराष्ट्र, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, कर्नाटक या ४ राज्यांतून प्रमुख मंदिरांचे पुजारी आणि विविध वेद पाठशाळांमध्ये अध्यापक म्हणून कार्यरत असणारे शिवाय वेदातील क्रमांत, घनांत असे अध्ययन पूर्ण केलेले वैदिक मान्यवर येणार आहेत. या ३ दिवसांच्या संमेलनात ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद या ४ वेदांच्या विशिष्ट शाखांचे सामूहिक पठण होणार आहे.
हे संमेलन रत्नागिरी शहरातील माधवराव मुळ्ये भवन येथे संपन्न होणार असून संमेलनात वेद, वेदविज्ञान या संबंधी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
वेदाचा प्रचार व प्रसार व्हावा आणि त्यांचे महत्व जनमानसापर्यंत पोहचावे हा या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे हा संमेलनाला वेदप्रेमी रत्नागिरीकरांनी उपस्थित राहावे असे आवाहन रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राच्या वतीने करण्यात आलेले आहे
Vision Abroad