



Konkan Railway: गणेश चतुर्थी नंतर कोकणातला मोठा सण म्हणजे शिमगोत्सव म्हणजेच होळी. अगदी तळकोकणापासून पालघर ठाणे पर्यंत ग्रामीण भागात मोठ्या उत्साहाने हा सण साजरा केला जातो. गणेश चतुर्थी प्रमाणेच हा सण साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात आपल्या गावी जातो. चाकरमान्यांचा मोठा वर्ग गावी जाण्यासाठी रेल्वेला प्राधान्य देतो.
यावर्षी होलिकाउत्सव मार्च १३ रोजी पासून सुरू होत आहे. मात्र या तारखे दरम्यानच्या जवळ जवळ सर्वच गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने ज्या चाकरमान्यांना आरक्षण भेटले नाही त्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. होळी आणि धूलिवंदन दिवशीच्या आणि आदल्या दिवशीच्या (१२,१३, १४ मार्च) तुतारी, कोकणकन्या, मांडवी, वंदे भारत, जनशताब्दी एक्सप्रेस, दिवा – सावंतवाडी एक्सप्रेस, मत्स्यगंधा एक्सप्रेसची आरक्षण स्थिती ‘रिग्रेट’ दाखवत आहे.
नियमित गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने चाकरमान्यांना अतिरिक्त गाड्यांची घोषणा होण्याची वाट पहावी लागणार आहे. अजूनपर्यंत रेल्वे प्रशासनाने कोणत्याही अतिरिक्त गाडीची घोषणा केली नाही आहे. मात्र या सणादरम्यान गाड्यांची आरक्षण स्थिती पाहता रेल्वे प्रशासनाला या मार्गावर जास्त गाड्या सोडाव्या लागणार आहेत.