मुंबई: दोडामार्ग तालुक्यातील भेडशी खानयाळ गावची सुकन्या आणि सद्यस्थितीत मुंबई-दहिसर येथे स्थायिक असलेल्या साक्षी बंड्या गावडे हिची 23 वर्षाखालील महिलांच्या गोवा रणजी क्रिकेट संघात ऑलराऊंडर खेळाडू म्हणून दिनांक २८ फेब्रुवारी रोजी निवड झाली असून तिचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. साक्षी हिने मास मीडिया मधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. इयत्ता सातवी पासून लेदर बॉल क्रिकेटचे धडे घेत आहे. तिचे वडील बंड्या गावडे यांना क्रिकेटची फार आवड. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिची यापूर्वी मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये १६ आणि १९ वर्षाखालील महिलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली होती. तिचा परफॉर्मन्स पाहून गोवा क्रिकेट अकॅडमीने तिची 23 वर्षाखालील महिलांच्या गोवा रणजी क्रिकेट स्पर्धेसाठी ऑलराऊंडर म्हणून निवड केली आहे. सध्या ती गोवा येथे रणजी क्रिकेट स्पर्धेसाठी प्रशिक्षण घेत आहे. सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त येथील अशोक नारायण परब (मांजरेकर) यांची ती नात असून रणजी संघामध्ये झालेल्या निवडीबद्दल तिच्या मामेगावी कलंबिस्त येथे तिचे कौतुक होत आहे. सामाजिक कार्यकर्ते किरण सावंत, निलेश पास्ते, अशोक राऊळ यांनी तिचे अभिनंदन केले आहे.