



Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे. महामार्गाच्या अपूर्णावस्थेतील कामांमुळे चाकरमान्यांना प्रत्येक सणात जीवघेणा प्रवास करत गाव गाठावे लागत आहे. महामार्ग काम रखडल्याच्या निषेधार्थ मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समिती १३ मार्च रोजी सायंकाळी ६ वा. माणगाव-बायपास व संगमेश्वर एसटी आगारासमोर सरकारच्या ‘डेडलाईन’ची होळी पेटवणार आहे. महामार्गावरील पळस्पेपासून सिंधुदुर्गपर्यंत एकाच दिवशी आंदोलन छेडून प्रशासनाच्या नावाने ‘शिमगा’ करणार आहे.
मुंबई-गोवा महामार्ग पूर्णत्वाच्या आजवर देण्यात आलेल्या सर्व ‘डेडलाईन’ हवेत विरल्या आहेत. महामार्गाच्या अपूर्णावस्थेतील कामासह ठिकठिकाणी निकृष्ट दर्जाच्या झालेल्या कामामुळे कोकणवासियांची कसरत अजूनही कायम आहे. प्रत्येक सणांपूर्वी महामार्गाचे काम पूर्ण होईल, अशी हमी दिली जाते. मात्र सण संपल्यानंतर त्याकडे कानाडोळा करत महामार्गाचे संथगतीने काम सुरू असून १४ वर्षे लोटून अजूनही कोकणवासियांचा वनवास संपलेला नाही. महामार्गप्रश्नी महामार्ग जनआक्रोश समितीने सातत्याने महामार्गावर आंदोलने, मोर्चे काढून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान, वेळोवेळी समितीच्या शिष्टमंडळाला देण्यात आलेल्या ‘डेडलाईन’ आजमितीसही पूर्ण झालेल्या नाहीत. या निषेधार्थ शिमगोत्सवात जनआक्रोश समितीने सरकारसह प्रशासनाच्या नावाने शिमगा करण्याचे अस्त्र उगारले आहे. या निषेध आंदोलनात कोकणवासियांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.