



कुडाळ:वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर खाली सापडून शाळकरी विद्यार्थिनी मनस्वी सुरेश मेथर (15, रा. निवती) जागीच ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास पाट तिठा (माऊली मंदिर नजीक) येथे घडली. मोटारसायकलस्वार युवकाला किरकोळ दुखापत झाली. मनस्वी मोटारसायकलच्या मागे बसून जात होती. वाळू वाहतूक करणारा डंपर परुळे – पाट मार्गे कुडाळच्या दिशेने येत होता. मोटारसायकल व डंपरची धडक बसून झालेल्या अपघातात मनस्वी डंपरच्या चाकाखाली सापडली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच निवती पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. जखमी मोटारसायकलस्वाराला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान निवती व पाट पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत, निवती पोलिस ठाण्यात धडक देत, अपघाताला कारणीभूत ठरणा-यांवर तातडीने गुन्हे दाखल करून कारवाई करावी, तसेच बेदरकार डंपर वाहतुकीला आळा घालावा अशी मागणी लावून ठरली. या अपघाताची खबर योगेश उल्हास मेतर (रा. निवती मेढा) यांनी निवती पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार या अपघातप्रकरणी सोळा वर्षीय मोटारसायकलस्वार मुलगा, गाडी चालविण्याचा परवाना नसतानाही त्याला गाडी चालविण्यास दिल्याने त्याचे वडील वैभव मांजरेकर (रा.हुमरमळा करमळीवाडी) आणि डंपर चालक शैलेश कुमार सिंग अशा तिघांवर निवती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहीती सहाय्यक पोलिस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांनी दिली.